कश्मीरात नगर परिषदेवर दहशतवादी हल्ला!पोलीस शहीद; नगरसेवकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरात दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. बारामुल्ला जिह्यात सोपोर नगरपरिषदेच्या कार्यालयावर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. यात एक पोलीस शहीद झाला असून, एका नगरसेवकाचा मृत्यू झाला आहे.

दिवसाढवळ्या गजबजलेल्या नगरपरिषद परिसरात घुसून दहशतवाद्यांनी हल्ला केल्यामुळे खळबळ उडाली आहे. गोळीबारात पोलीस शफत अहमद हे शहीद झाले. नगरसेवक रियाझ अहमद यांचा मृत्यू झाला. तसेच नगरसेवक शमसुद्दीन मीर हे गंभीर जखमी झाले. सोपोरमधील हल्ल्यानंतर काश्मीर खोऱयात हायअलर्ट जारी केला आहे. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सकडून शोधमोहिम सुरू आहे. सर्व रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी दिली.

पाच दिवसांत दुसरा हल्ला

गजबजलेल्या ठिकाणी बेछूट गोळीबार करून पसार व्हायचे असे दहशतवादी हल्ले काश्मीर खोऱयात वाढले आहेत. पाच दिवसांतील हा दुसरा हल्ला आहे. 25 मार्चला श्रीनगरनजीक लावापोरा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला होता. यात दोन जवान शहीद आणि दोन जवान जखमी झाले होते.