टंचाईचे चटके वाढू लागले, पाण्याच्या टँकरसाठी ठाणेकरांना मोजावे लागणार एक हजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाणीटंचाईचे चटके ठाणे शहरात वाढू लागले आहेत. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असून अनेक गृहनिर्माण संस्थांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी टँकरमाफिया जादा पैसे उकळत असल्याने ठाणे महापालिकेने आता स्वतः दर निश्चित केले आहेत. ठाणेकरांना एका टँकरमागे एक हजार रुपये मोजावे लागणार असून त्यातील पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी करता येणार नाही.

गेल्या आठवड्यापासून शहरातील बहुतेक सोसायटी तसेच बड्या गृहसंकुलामधून टँकरची मागणी वाढली आहे. पालिकेकडून देण्यात येणारे टँकर हे फक्त घरगुती वापरासाठी असून टॉयलेट, बाथरूम फ्लशिंग किंवा बांधकामासाठी या पाण्याचा वापर करता येणार नाही. सर्वसाधारण सभेत पालिकेने निश्चित केलेल्या दरानुसार १० हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी वाहतुकीसह १ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत. घरगुती वापरासाठी दहा हजार लिटर पाण्यासाठी प्रति फेरा ७०० रुपये तर व्यावसायिक वापरासाठी १ हजार ५०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच टँकरमालकांनी निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारल्यास टँकरमालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

घोडबंदरसाठी स्वतंत्र भरणा केंद्र

सात प्रभाग समित्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी साकेत येथे एकच टँकर भरणा केंद्र आहे. मात्र येथे मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने वेळेत टँकरने पाणीपुरवठा करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे घोडबंदर रोड परिसरासाठी ब्रह्मांड जलकुंभ येथे स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी सोसायटीच्या लेटरहेडवर मागणी करणे आवश्यक असून कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांच्या स्वाक्षऱ्या तसेच पाणीपुरवठ्याबाबतची आवश्यक माहिती देणे बंधनकारक राहणार आहे