
रायगड किल्ल्याहून ५० पर्यटकांना घेऊन चाललेली सुसाट लक्झरी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट कॅश बॅरियर्सला धडकली. कॅश बॅरियर तोडून या बसचा पुढचा भाग खोल दरीच्या तोंडावरच लोंबकळू लागला. हे दृश्य पाहून बसमधील प्रवासी हादरून गेले. स्थानिक गावकऱ्यांनी धाव घेऊन या सर्वांची सुखरूप सुटका केली. ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ या म्हणीचा प्रत्यय या प्रवाशांना आला.
अक्षरा ट्रॅव्हल्स कंपनीची बस ५० पर्यटकांना घेऊन किल्ले रायगड दर्शनासाठी आली होती. रायगड किल्ल्यावरील सर्व ऐतिहासिक वास्तूंना भेटी दिल्यानंतर हे पर्यटक परतीच्या प्रवासाला निघाले. महाड येथून पुनाडेमार्गे माणगावकडे येत असताना घाटाच्या तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस थेट क्रॅश बॅरियर्सवर आदळली. क्रॅश बॅरियर्स तोडून या बसचा पुढील भाग दरीच्या तोंडावरच लोंबकळू लागला. तुटलेल्या लोखंडी क्रैश बॅरियरला या बसचे पुढचे चाक अडकले. त्यामुळे ही बस खोल दरीत कोसळता कोसळता बचावली.
गावकरी मदतीला धावले
बस दरीच्या तोंडावर लोंबकळत असल्याचे कळताच स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील तरुणांनी मोठ्या कौशल्याने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका केली.
तोंडातून शब्दही फुटेना
साक्षात मृत्यू समोर दिसत असल्याचे पाहून बसमधील प्रवासी हादरून गेले. त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. ग्रामस्थ तरुणांनी त्यांना धीर देऊन कौशल्याने बसमधून उतरवले. त्यानंतर अनेकांच्या अश्रूचा बांध फुटला. प्राण वाचवल्याबद्दल त्यांनी देवाचे आणि गावकऱ्यांचे आभार मानले.






























































