‘होऊ द्या चर्चा’ला मिंधे सरकार टरकले, ठाण्यात जमावबंदीचे आदेश

राज्यातील बेकायदा मिंधे सरकारचा खोटारडेपणा आणि त्यांच्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सुरू केलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाला मिंधे सरकार अक्षरशः टरकले आहे. ठाण्यात या कार्यक्रमांना मिळणारा तुफान प्रतिसाद पाहून मिंध्यांच्या पायाखालची वाळू घसरली असून त्यांनी पोलिसांच्या आडून हा कार्यक्रम बंद पाडण्याचा डाव आखला आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी ठाण्यात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. सरकारच्या या मोगलाईविरोधात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना निवेदन दिले आहे. आमच्या ‘कॉर्नर मिटिंग’ होणारच. हिंमत असेल तर अडवून दाखवा, महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते पोलीस ठाण्याला घेराव घालतील असा इशाराच त्यांनी दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या सुचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचा धुरळा उडाला आहे. राज्यातील प्रत्येक नाक्यानाक्यावर, चौकाचौकात सरकारच्या बोलघेवडय़ा आणि दडपशाही कारभाराचा पर्दाफाश केला जात आहे. बेकायदा सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश, या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी  सुरू असलेली चालढकल, सरकारकडून होणारी फसवणूक, ढोंगी सरकारचे कारनामे याबाबत शिवसैनिक जनतेशी थेट संवाद साधत आहेत. ठाण्यात या उपक्रमाचा जोरदार धडाका सुरू आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा ठाण्यात 15 ते 17 सप्टेंबरपर्यंत पार पडला. आता दुसऱया टप्प्याला सुरुवात झाली असून 1 ते 11 ऑक्टोबरपर्यंत ठाण्याच्या चारही विधानसभा क्षेत्रात ही मोहीम दणक्यात राबवण्यात येत आहे.

ठाणेकरांचा प्रचंड प्रतिसाद शिवसेनेच्या या चौक सभांना मिळत असल्याने मिंधे सरकारच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यांनी पोलिसांच्या आडून रडीचा डाव सुरू केला आहे. ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमामुळे संध्याकाळी वाहतूककाsंडी होत असल्याचे न पटणारे कारण देत ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.    याविरोधात महाविकास आघाडी प्रचंड आक्रमक झाली असून त्यांनी ही दडपशाही सहन करणार नाही असा थेट इशाराच पत्रकार परिषद घेऊन दिला. पोलिसांच्या आडून मिंधे सरकार गेली दीड वर्ष शिवसैनिकांना छळत आहेत. खोटय़ा केसेस दाखल केले जात आहे. पण शिवसैनिक कणखरपणे  हा लढा लढत आहेत. आताही ‘होऊ द्या चर्चा’ ही मोहीम पोलिसांची परवानगी घेऊनच सुरू आहे. चौकाचौकातील मीटिंगना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सणाचे कारण सांगत ही मोहीम रद्द करण्यासाठी मनाई आदेश लागू केला आहे असा आरोप शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या मोहिमेची गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांच्या पायाखालची वाळु घसरली आहे. एका रात्रीत तुमचा वटहुकूम निघतोच कसा? तुम्ही कितीही दडपशाही केली तरी या चौकसभा होणारच. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे शिवसैनिक पालन करतीलच. पण तुम्ही रोखण्याचा प्रयत्न केला तर याहीपेक्षा मोठी गर्दी महाविकास आघाडी जमवेल असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

दडपशाही झुगारून ठाण्यात ‘होऊ द्या चर्चा’ जोरात

जमावबंदीचे आदेश झुगारून ठाण्यात बुधवारीही ‘होऊ द्या चर्चा’ हा कार्यक्रम दणक्यात आयोजित करण्यात आला. खारटन रोड परिसर, चेंदणी कोळीवाडा, सिडको बस स्टॉप आणि स्टेशन रोड मार्पेट येथे खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, संपर्कप्रमुख सुभाष म्हसकर, उपशहरप्रमुख सचिन चव्हाण, महिला आघाडी उपशहर संघटक मंजिरी ढमाले, माजी नगरसेवक मंदार विचारे, विभागप्रमुख संजय भोई, उपविभागप्रमुख राकेश जाधव, देवशी राठोड, महिला विभाग संघटक सोनल ठाकूर, संतोषी कोळी, शाखाप्रमुख आनंद मानकामे, रवी ठाकूर, दिनेश मेहरोल, परेश कांबळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

पोलिसांनी लावले ‘कमल’चे कलम

ठाणे पोलिसांनी मनाई आदेश काढल्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना नोटिसा बजावल्या आहेत. यात ‘फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे’ या नोटिसा धाडल्या आहेत. मात्र या नोटिशीत ‘कलम’ ऐवजी ‘कमल’ असा शब्द छापला आहे. हा शब्द कुठून आला? ठाणे पोलीस कोणाच्या आदेशाने काम करत आहेत, पोलिसांनी कमलाचे नवीन कलम कुठून शोधून काढले, असा संतप्त सवाल राजन विचारे यांनी केला.