
घोडबंदर रोडच्या विस्तारीकरणासाठी हजारो झाडांचा बळी गेला असतानाच आता रिंग मेट्रो प्रकल्पासाठी देखील तब्बल 5 हजार 380 खारफुटींची कत्तल केली जाणार आहे. तसा प्रस्तावच पेंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे लवरच पाठवला जाणार आहे. विशेष म्हणजे अंतर्गत रिंग रोड मेट्रोला ठाण्यातील पर्यावरणप्रेमी आणि असंख्य नागरिकांचा विरोध असूनही हा प्रकल्प नागरिकांच्या माथी प्रशासन मारत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. खारफुटीची बेसुमार कत्तल होणार असल्याने 6.65 हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे.
कासारवडवली ते घाटकोपर मेट्रो प्रकल्प अजून पूर्ण झालेला नाही. त्यातच आता रिंग मेट्रोचे घोडे दामटवले जात आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, असा दावा अधिकारी करीत आहेत. अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचे काम ‘महामेट्रो’ व ठाणे महापालिकेच्या वतीने केले जाणार आहे. मात्र त्यास घोडबंदर, उपवन, चेंदणी कोळीवाडा, वसंत विहार येथील असंख्य नागरिक व संघटनांनी ठाम विरोध केला आहे. रिंग मेट्रोसाठी खारफुटी तसेच झाडे तोडू नयेत या मागणीसाठी आंदोलने देखील करण्यात आली आहेत. मात्र हा विरोध डावलून 5 हजार 380 खारफुटींची कत्तल करण्याचा डाव प्रशासनाने आखला आहे.
ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खाडी किनारालगत असलेली खारफुटी उद्ध्वस्त केल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरते. त्यामुळे असंख्य पुटुंबांचे नुकसान होत आहे.
खारफुटीमुळे किनारपट्टी भागातील खेकडे, पक्षी तसेच माशांचे देखील संरक्षण होते, असे पर्यावरणतज्ञांचे मत आहे. रिंग रूट मेट्रासाठी पाच हजारांहून अधिक खारफुटी तोडली तर पर्यावरणाचा समतोल ढासळणार आहे.
खाडीतील जलसृष्टी धोक्यात
रिंग मेट्रो प्रकल्पाचा काही भाग हा ठाण्याच्या खाडी परिसरात असलेल्या खारफुटीतूनच जातो. त्याचा स्वतंत्र अभ्यास तज्ञांनी केला आहे. प्रकल्पाच्या बांधकामामुळे गाळ, सिमेंट, खडी तसेच अन्य गोष्टी खाडीमध्ये मिसळल्या तर जलचर सृष्टीवर गंभीर परिणाम होईल, असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे. महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने खारफुटी तोडण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पेंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर ठाण्याच्या खाडीतील खारफुटींची कत्तल होणार असल्याचे सांगण्यात आले.





























































