
देशातला तरुण आता सरकारला घाबरत नाही, तो आता त्यांच्या प्रश्नांचा जाब सरकारला विचारणार आहे. नीट परीक्षेमध्ये लाखो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे. सीबीएसई बोर्ड साधी परीक्षा घेऊ शकत नाही. तुम्ही तरुणांची परीक्षा घेऊ शकत नाही, त्यांना नोकरी देऊ शकत नाही, त्यांनी जाब विचारला तर त्यांना पाकिस्तानी म्हणतात. पण ,आता तरुण जागा झाला आहे, कालचे जंतरमंतरचे आंदोलन यशस्वी झाले आहे. आम्ही शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणारच, असा निर्धार कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर हजारो लोकांच्या उपस्थितीत भव्य आंदोलन केल्यानंतर, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके रविवारी पहाटे ५ वाजता छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले. अमेरिकेतून हिंदुस्थानात परतत दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांविरोधात रणशिंग फुंकणारे दिपके वाळूज महानगर येथील आपल्या निवासस्थानी पोहोचताच नातेवाईकांनी त्यांचे ओवाळून स्वागत केले. मात्र, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्या घराभोवती छावणीचे स्वरूप आले असून कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
रविवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अभिजित दिपकेम्हणाले की, यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र करत देशव्यापी’ करण्याचा इशारा दिला. कॉक्रोच जनता पार्टीने उभारलेले दिल्लीतील आंदोलन पूर्णपणे यशस्वी झाले आहे. नीट परीक्षेतील घोटाळ्याविरोधात झालेल्या या आंदोलनात तब्बल ६ ते ७ हजार लोक सहभागी झाले होते. मात्र, ज्या मुख्य मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो, ती मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आमचा हा लढा इथेच थांबणार नाही, तर तो पुढेही सुरूच राहील.
केंद्रीय मंत्र्यांना थेट आव्हान देत दिपके पुढे म्हणाले, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही. जंतरमंतरनंतर आता हे आंदोलन आम्ही संपूर्ण देशव्यापी करणार आहोत. या पुढील देशव्यापी आंदोलनाची रूपरेषा आणि तारीख लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
आम्ही सगळेच पाकिस्तानी आहोत का?
नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे केंद्र सरकारवर टीका होत आहे. एका तरूणाने साधी परीक्षा घेता येत नसल्याची टीका करताच त्याला पाकिस्तानी ठरविले. लाखो तरूणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. एका तरूणाने आत्महत्या केली. सरकारच्या नियोजनशुन्य कारभारावर टिका करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला तर आम्ही सगळेच पाकीस्तानी आहोत का? असा सवाल दिपके यांनी केला.
घराला पोलिसांचा वेढा; औक्षण करून स्वागत…
अभिजित दिपके पहाटे वाळूज महानगर येथील आपल्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या आगमनानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले. मात्र, दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केल्यापासून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सातत्याने धमक्या येत आहेत. या गंभीर पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कोणतीही जोखीम न पत्करता दिपके यांच्या घराभोवती कडेकोट बंदोबस्त लावला आहे.
संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ कारवाई- पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर
सुरक्षेच्या कारणास्तव अभिजित दिपके यांच्या घरासमोर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पोलीस सुरक्षेवर लक्ष ठेवून आहेत. याविषयी माहिती देताना पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी सांगितले की, दिपके यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख खबरदारी घेतली आहे. त्यांच्या घराबाहेर बंदोबस्त तैनात असेल. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा अनुचित प्रकार आढळून आल्यास पोलीस तातडीने आणि कडक कारवाई करतील.























































