
उत्तर प्रदेशातील एका ट्रक चालकाने चेन्नईत दोघांच्या अंगावर ट्रक चढवून त्यांना चिरडून ठार केले आहे. तर या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ट्रक चालकाला दारूच्या नशेत असलेल्या तिघांनी पैशाची मागणी करून त्रास दिल्याचा आरोप आहे. चेन्नईच्या रेड हिल्समधील एका खाजगी ट्रक पार्किंग यार्डमध्ये ही घटना घडली आहे.
कन्हैया सिंग (35) आणि क्रिश कुमार (26) हे ट्रक चालक पार्किंग यार्डात संध्याकाळी 7.30 च्या सुमारास जेवणाची तयारी करत होते. यावेळी कुमारन (३६) कमला कन्नन (३५) आणि नवीन (२६) हे तीन मद्यधुंद इसम त्यांच्या जवळ आले व त्यांच्या हातातील चपात्या हिसकावल्या. यावेळी त्यांनी कन्हैयाकडे पैशांची मागणी केली.
कन्हैयाने नकार दिल्यावर त्यांनी ट्रकचे हेडलाइट तोडले आणि मारहाण केली. यावेळी संतापलेला कन्हैय्या ट्रकमध्ये चढला आणि तिघांच्या अंगावर ट्रक चढवला. यात कुमारन आणि कमला कन्नन यांचा जागीच मृत्यू झाला.






















































