वातावरण बदलाचा पहिला रुग्ण कॅनडात; 70 वर्षीय वृद्धेला श्वास घेण्यास त्रास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान बदलावर चिंता व्यक्त केली जात असतानाच कॅनडात वातावरण बदलामुळे श्वसनाचा त्रास होणारा पहिला रुग्ण आढळला आहे. उष्णतेची लाट आणि हवेच्या खराब गुणवत्तेमुळे 70 वर्षीय महिलेची प्रकृती बिघडल्याचे तिच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांचे म्हणणे आहे. ग्लास्गो येथे नुकत्याच पार पडलेल्या कॉप-26 परिषदेत अनेक देशांनी वातावरण बदलावर चिंता व्यक्त केली होती.

संबंधित महिला कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉ. काइल मेरिट म्हणाल्या, गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच एखाद्या रुग्णावर उपचारात निदानावेळी हवामान बदलाचा उल्लेख करावा लागला आहे. त्या पुढे म्हणाल्या, संबंधित महिलेला मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास आहे. एसीशिवाय त्या ट्रेलरमध्ये राहतात. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा त्यांच्यावर दुष्परिणाम झाला. खरंतर त्या हायड्रेटेड राहण्यासाठी धडपड करत आहेत. फक्त रोगांच्या लक्षणांवर उपचार करण्याऐवजी त्याच्यामागील कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. मेरिट यांच्या म्हणण्यानुसार या महिलेच्या आजाराबाबत त्यांना जूनमध्येच समजले होते. देशात वातावरण बदलाची समस्या इतकी गंभीर आहे की एकटय़ा ब्रिटिश कोलंबियामध्ये 500 जणांना जीव गमवावा लागला होता. वाढत्या उष्माघातापासून नागरिकांना स्वतःची काळजी घेण्यासाठी पॅनडा सरकारने जूनमध्ये मार्गदर्शक तत्त्वदेखील जारी केली होती.

कॅनडा आणि अमेरिकेच्या अनेक भागांत यंदा तीव्र स्वरुपाच्या उष्णतेची लाट होती. या उष्माघातामुळे शेकडो लोकांना प्राण गमवावा लागला आहे. एकटय़ा कोलंबियामध्ये उष्माघाताने 233 लोकांचा बळी घेतला आहे. याला जलवायू परिवर्तनच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, तापमानवाढीचा आधीपासून आजारी असलेल्या लोकांच्या प्रकृतीवर गंभीर स्वरुपाचा परिणाम होऊ शकतो.