
शेततळय़ात पोहायला गेलेल्या महिलेसह दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. शेततळय़ात आधारासाठी बांधलेली दोरी तुटल्यामुळे तिघीही पाण्यात बुडल्या. इतर सहाजणांना वाचविण्यात यश आले आहे. कराड तालुक्यातील पाडळी येथे आज सकाळी घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.
शोभा नितीन घोडके (वय 35), रागिणी रामचंद्र खडतरे (वय 8) व वैष्णवी गणेश खडतरे (वय 15) अशी बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाडळी (हेळगाव) येथील एका शेतकऱ्याकडे शेतमजुरी करण्यासाठी कुटुंब वास्तव्यास आले आहे. डोंगरालगत असलेल्या या शेतात पाण्यासाठी मोठे शेततळे बांधण्यात आले आहे. या शेततळ्यावर शेतमजुरांसह काहीजण पोहण्यासाठी जातात. शेततळ्यात पोहताना आधारासाठी दोरी बांधली होती.
आज सकाळी सुमारे नऊजण शेततळ्यावर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी ज्यांना पोहता येत नाही, ते दोरीचा आधार घेत पोहण्यासाठी पाण्यात उतरले. यावेळी अनेकजण दोरीला लटकल्यामुळे दोरीवर अतिरिक्त ताण येऊन ती तुटली. त्यामुळे दोरीचा आधार घेतलेले सर्वजण पाण्यात बुडू लागले. यावेळी काठावर असलेल्यांनी बुडणाऱयांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सहाजणांना वाचविण्यात त्यांना यश आले; परंतु एका महिलेसह अन्य दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेने पाडळी (हेळगाव) परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची नोंद मसूर पोलीस ठाण्यात झाली आहे.






























































