शास्त्रीय नृत्याविष्कार अनुभवण्याची संधी; 24 ऑगस्टपासून संजुक्ता पाणिग्रही महोत्सव रंगणार

स्मितालयतर्फे 21 व्या संजुक्ता पाणिग्रही महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 24 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता माटुंग्यातील यशवंत नाट्यमंदिर आणि 25 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील सावरकर सभागृहात हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात दरवर्षी देशातील विविध शास्त्रीय नृत्यप्रकार सादर होतात. या वर्षी नृत्यनिपुण आई व मुलगी एकत्र नृत्य सादर करतील तसेच दोन विविध शास्त्रीय नृत्यप्रकार एकाच वेळी रंगमंचावर सादर होतील.

स्मितालय ही ओडिसी शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण देणारी मुंबईतील पहिली संस्था, जी प्रख्यात अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे यांनी सुरू केली. 2004 पासून स्मितालय ‘संजुक्ता पाणिग्रही युवा महोत्सव’ सादर करीत आहे. संजुक्ता पाणिग्रही या ओडिसी नृत्यजगातील नृत्यसम्राज्ञी यांच्या जन्मदिनी हा युवा महोत्सव भरविण्यात येतो.

शनिवारी सुजाता मोहापात्र, कन्या प्रीतीशा (ओडिसी), गौरी त्रिपाठी, कन्या तारिणी (कथ्थक), नीलेश सिंघा, पुर्बिता मुखर्जी (भरतनाट्यम, मणिपुरी), प्रतीशा सुरेश, अनेरी शेठ (सत्रिया, मोहिनीअट्टम) या कलाकांराचे परफॉर्मन्स सादर होतील. रविवारी अरुंधती पटवर्धन, कन्या सागरिका (भरतनाट्यम), वैजयंती काशी, कन्या प्रतीक्षा (कुचीपुडी), मिताली, राऊल डिसुझा (ओडिसी, भरतनाट्यम), सरिता कालेले, अंकुर बल्लाळ (कथ्थक, ओडिसी) यांचे परफॉर्मन्स होतील. तिकीट बुक माय शोवर उपलब्ध आहेत.