रंगनाटय़ – ‘खांदेरी’च्या इतिहासाचे रंगमंचीय वर्तमान…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>राज चिंचणकर

‘खांदेरी’ किल्ल्यावर घडलेला मराठय़ांचा पराक्रम दृग्गोचर  करत इतिहासाच्या पानांत दडलेल्या घटनेला वर्तमानात रंगभूमीवर जिवंत करणारे नाटक.

कल्याणला दुमदुमला भेरी चौघडा, गर्जे कडकडा, शिंपिला मनोरंजनाचा सडा, उमटली पदचिन्हे दारात, प्रकटली दर्याभवानी साक्षात, उजळला रंगमंच तेजात… अशा ओळी कानांवर पडताच अंगावर रोमांच उभे राहतात. भरसमुद्रात उभ्या असलेल्या ‘खांदेरी’ किल्ल्याचा रंगमंचीय संदर्भ या पंक्तींना आहे आणि त्यासाठी निमित्तमात्र ठरले आहे ते ‘दर्याभवानी’ हे नाटक! ‘उर्विजा थिएटर’ या नाटय़ संस्थेने हे नाटक रंगभूमीवर आणून इतिहासाच्या पानांत दडलेल्या घटनेला वर्तमानात अवतीर्ण केले आहे.

तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर जिवंत होतो आणि ‘खांदेरी’ किल्ल्यावर घडलेला मराठय़ांचा पराक्रम रंगमंचावर दृग्गोचर होतो. ‘खांदेरी’वर भक्कम पाय रोवून उभा ठाकलेला सुभेदार मायनाक भंडारी याच्याभोवती हे कथासूत्र फिरते. त्याच्या नेतृत्वाखाली स्वराज्यातल्या असंख्य हातांनी गाजवलेला पराक्रम हे नाटय़ मंचित करते. लेखक व गीतकार संदीप विचारे तसेच दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर यांच्या हातून हे अचंबित करणारे कार्य घडले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी तत्कालीन ‘खांदेरी’ बेट सागरी युद्धात इंग्रजांकडून जिंकून घेत इतिहास घडवला. हे सर्व वर्तमानात आविष्कृत करण्याच्या उद्देशाने साक्षात ही ‘दर्याभवानी’ रंगमंचावर अवतरली आहे. पन्नासहून अधिक कलाकारांचा ताफा असलेला हा आविष्कार नाटय़ आणि नृत्याच्या संगमातून रंगमंचावर सादर होतो. इंग्रज विरुद्ध मराठय़ांचे दोन जहाजांवर छेडले गेलेले युद्ध रंगभूमीवर ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्याची संधीही या नाटकाने दिली आहे.

महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध किल्ल्यांवरच्या घटना मांडण्याचा मोह टाळून लेखक संदीप विचारे यांनी या नाटय़कृतीसाठी ‘खांदेरी’ किल्ला निवडत मुळातच अवघड जबाबदारी शिरावर घेतल्याचे स्पष्ट होते. इतिहासाशी प्रामाणिक राहत त्यांनी हे कथासूत्र बांधले असून यानिमित्ताने एक आगळी नाटय़संहिता त्यांच्या हातून लिहिली गेली आहे. इतका मोठा घाट रंगमंचावर घालायचा तर त्यासाठी अंगी मोठे धाडस हवे. त्यासाठी संदीप विचारे यांनी निर्माता म्हणून आणि ललिता संतोष पोवळे यांनी सादरकर्त्या या भूमिकेद्वारे हे धाडस दाखवत हा इतिहास रंगभूमीवर मांडला आहे.

असे नाटय़ मंचित करताना दिग्दर्शकाच्या खांद्यावरही जबाबदारीचे ओझे येणे क्रमप्राप्त आहे, परंतु डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी ‘खांदेरी’ किल्ल्यावर घडलेल्या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व लक्षात घेत आणि मराठा आरमाराचे काwशल्य व पराक्रम दृग्गोचर करत हे नाटय़ उभे केले आहे. काही प्रसंगांत मात्र पात्रांचे सरळ रेषेत येऊन उभे राहणे टाळता येणे शक्य होते. अर्थात पन्नासहून अधिक कलाकार नाटकात असल्याने प्रत्येक प्रसंगी विशिष्ट आकृतिबंध बांधण्यावर मर्यादा आली असावी, पण त्यामुळे नाटय़ाशयाला बाधा मात्र येत नाही.

हे नाटक म्हणजे समूहनाटय़ आहे. त्यामुळे अशा नाटय़ात कुणी एकजण प्रमुख भूमिका वठवण्याची शक्यता नसते. मात्र यातला सुभेदार मायनाक भंडारी याच्या नेतृत्वाखाली सूत्रे हलत असल्याने तोच या नाटकाचा म्होरक्या ठरतो. याचे अचूक भान बाळगत रोहित मावळे याने ही भूमिका ठाशीव पद्धतीने रंगवली आहे. त्याच्यासोबत सचिन लिमये, विकास पवार, अमेय दळवी, जयंत पानसे, प्रसाद वैद्य, नीलेश पाटील, धर्मश्री धारपवार, अनुप सिंग, सूरज परब आदी कलाकारांनी या ‘दर्याभवानी’साठी योगदान देत आपापले कर्तव्य बजावले आहे.

अशा प्रकारच्या नाटकात पात्रांचे रंगमंचावरचे ‘दिसणे’ महत्त्वाचे ठरते. त्यानुसार पात्रांची वेशभूषा व रंगभूषेसाठी वेगळे कष्ट घेणे ओघाने आलेच. वेशभूषाकार मोहिनी टिल्लू, कलिका विचारे, गणेश मांडवे आणि रंगभूषाकार उदयराज तांगडी यांनी हे काम लीलया पार पाडले आहे. नाटकाचा आशय लक्षात घेता यात नेपथ्यही महत्त्वाचे आहे. नेपथ्यकार प्रसाद वालावलकर यांनी यात किल्ला, बेट, जहाज तसेच समुद्राचा आभास निर्माण करणारी रचना रंगमंचावर देखण्या पद्धतीने उभी केली आहे. शीतल तळपदे यांनी त्यांच्या प्रकाश योजनेतून समुद्रातल्या दीपस्तंभासह आवश्यक असणारे इतर झोत नीट प्रकाशमान केले आहेत. मनोहर गोलांबरे यांची संगीतसाथ नाटय़ाला पूरक आहे. सचिन गजमल यांच्या नृत्यरचनांचा यात मोठा वाटा असून त्यांच्या या रचना नाटकाच्या आकर्षणात भर घालणाऱया आहेत. एकूणच ‘दर्याभवानी’ हा एक भव्य नाटय़ाविष्कार आहे आणि तो त्याच स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणाऱया तन-मन-धन आदी गोष्टी जुळवून आणणे हे सोपे काम नव्हे. साहजिकच या नाटकाचे प्रयोग सातत्याने सादर करण्याला मर्यादा आहेत. मात्र अजिबात न चुकवता या इतिहासाची रंगमंचीय अनुभूती घेणे हा नक्कीच एक विलक्षण योग आहे.

[email protected]