खोदकाम करताना सात फुटांवर लागले झरे: ऐन दुष्काळात नाला तुडूंब भरून वाहू लागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चापोली

आनंदवाडी (ता. चाकूर) येथे जलयुक्त शिवार अंतर्गत नाला सरळीकरणाचे काम सुरू असताना अचानक नाल्यात जिवंत पाण्याचे झरे मोकळे झाल्याने ऐन दुष्काळात नाला तुडूंब भरून वाहू लागला. नागरिकांना ही बातमी कळताच तेथे पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली.

आनंदवाडी येथे भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार अंतर्गत नाला सरळीकरण व रुंदीकरणाचे साडे आठ किलोमीटर काम करण्यात येत आहे. साठवण तलाव ते राजीव गांधी विद्यालय दरम्यान असलेल्या तीन किलोमीटर नाल्याचे खोदकाम सध्या सुरू आहे. खोदकाम सुरू असतानाच पाण्याचे झरे वाहू लागले. काही वेळातच नाल्यात पाणी तुडुंब भरले. ही बातमी गावात पसरताच ग्रामस्थांनी झरे पाहण्यासाठी एकच गर्दी केली.

सध्या भीषण दुष्काळामुळे विहीरी, नदी, नाल्यांमध्ये पाण्याचा थेंबही पाहायला मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह पशुधनालाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. अनेक शेतकरी थोडं तरी पाणी लागेल या आशेवर शेतात विंधन विहिरी घेण्याचा सपाटा लावला आहे. मात्र त्यांची घोर निराशाच होत आहे. अशा परिस्थितीत फक्त सात फुटावर पाण्याचे झरे वाहत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जलयुक्त शिवार योजना ही आमच्या गावासाठी नक्कीच वरदान ठरणार आहे. या माध्यमातून आम्ही आमचे गाव दुष्काळ मुक्त करू. यामुळे भविष्यात आमच्या शिवारात पाणीचपाणी पहावयास मिळेल. आता मिळालेले हे पाणी भटकंती करणाऱ्या जनावरांसाठी आरक्षित केले जाणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.