रत्नागिरीच्या निवळीतून 10 चाकी डंपरची चोरी; कर्नाटकात सापडला, आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीतील निवळी येथून चोरीला गेलेला 10 चाकी डंपर शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीला गेलेला डंपर पोलिसांनी कर्नाटकातून जप्त केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. 14 मे ते 15 मे रोजी इसार पेट्रोलपंप निवळी (ता.रत्नागिरी) येथे टाटा कंपनीचा 10 चाकी डंपर अज्ञात चोरटयाने चोरून नेला. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्हयाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेहनत घेत गुन्हयातील आरोपी लक्ष्मण उर्फ बाळु नामदेव चवरे (वय 22, रा. चवरे वस्ती पेनुर, ता.मोहोळ, जिल्हा सोलापूर) याला सोमवारी गाणगापूर (ता. अफजलपूर, जिल्हा कलबुर्गी, कर्नाटक) अटक केली आहे. त्याच्याताब्यातून गुन्ह्यातील चोरीस गेलेला डंपर, गुन्हा करणेकामी वापरण्यात आलेली कार व इतर साहीत्य असा एकूण 28, 63,200 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी लक्ष्मण उर्फ बाळु नामदेव चवरे याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा करण्यासाठी
गणेश अरुण पाटील, समाधान शिवाजी चवरे (दोन्ही रा. पेनुर ता. मोहळ, जि. सोलापूर) हे सोबत असल्याची माहीती दिली आहे. दोघेजण हे सराईत गुन्हेगार आहेत. आरोपी व सदर गुन्ह्याकामी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कार्यवाहीकरीता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे.