वेब न्यूज – अरे चोरा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

जगभरातील विविध घडामोडी सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. लोक त्यावर साधकबाधक चर्चादेखील करत असतात. जगाच्या कानाकोपऱयात घडलेल्या आश्चर्यकारक चोरीच्या घटना आणि त्यांच्या कथा आवडणारा एक मोठा वाचक वर्ग आहे. अत्यंत चातुर्याने केलेल्या या चोऱया, त्यांची उलगडलेली, न उलगडलेली कोडी, काही फसलेल्या चोऱया हा अनेकांच्या आवडीचा विषय. आता त्यामध्ये चक्क हिंदुस्थानच्या एका चोरीची भर पडलेली आहे. हिरे, मोती किंवा पैशांची नाही, तर आपल्या देशात चक्क एका बस स्टॉपची चोरी झाली आहे, तीदेखील बंगळुरूसारख्या प्रख्यात शहरात.

आजवर तुम्ही बस स्टॉपवर झालेल्या चोऱयांबद्दल ऐकले असेल, कदाचित कोणी त्याचा अनुभवदेखील घेतला असेल. मात्र बंगळुरू शहरात काही दिवसांपूर्वी चक्क बस स्टॉप चोरीला गेला आहे. स्टेनलेस स्टील स्ट्रक्चरपासून बनलेल्या या दहा लाख रुपये किमतीच्या आधुनिक बस स्टॉपमधील सामानाची चोरी करण्याच्या भानगडीत न पडता चोरांनी रातोरात संपूर्ण बस स्टॉप गायब करण्याची करामत करून दाखवली आहे. बंगळुरूमधील कनिंघम रोडवर हा बस स्टॉप उभारण्यात आलेला होता. विशेष म्हणजे शहराच्या आयुक्त कार्यालयासारख्या गजबजलेल्या भागात हा बस स्टॉप उभारण्यात आला होता.

नव्याने उभारण्यात आल्यापासून अवघ्या एका आठवडय़ात बस स्टॉप चोरीला गेल्याने तो चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. सध्या हा बस स्टॉप बंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशनच्या (BMTC) देखरेखीमध्ये होता. या बस स्टॉपची निर्मिती करणाऱया कंपनीने यासंदर्भात पोलीस तक्रार दाखल केलेली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी त्वरेने हालचाल सुरू करून सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरुवात केली आहे. बंगळुरूच्या पूर्व आणि उत्तर भागाला जोडणारा हा बस स्टॉप नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. बनासवाडी, येलहंका आणि हेब्बाल भागासाठी इथून बस धावतात. बस स्टॉप चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मनोरंजक असणार आहे हे नक्की.