तिसऱया लाटेचे संकेत, डिसेंबरमध्ये कोरोनाचा ‘गुणाकार’

मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याने कोरोनाचा ‘गुणाकार’ सुरू असल्याचे धोकादायक चित्र निर्माण झाले असून ‘तिसऱया लाटे’चे संकेत मिळत आहेत. यामध्ये 1 डिसेंबर रोजी सक्रिय रुग्णांची 1904 असलेली सक्रिय रुग्णसंख्या चार पटींनी वाढून 8060 वर पोहोचली आहे. तर प्रतिबंधित क्षेत्रेही 1336 वरून 5876 वर पोहोचली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी मात्र झपाटय़ाने घटला असून 2780 दिवसांवरून 682 दिवसांपर्यंत खाली आहे.

मुंबई फेब्रुवारी 2021 च्या मध्यावर आलेली कोरोनाची दुसरी लाट नोव्हेंबरपर्यंत पूर्ण नियंत्रणात आली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेसह युरोपीय देशांमध्ये दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हेरिएंट ओमायक्रोनने मुंबईचे टेन्शन वाढवले आहे. ओमायक्रोन सर्वाधिक वेगाने पसरत असला तरी डेल्टापेक्षा घातक नसल्याचे आरोग्यतज्ञांकडून सांगण्यात येत असले तरी दैनंदिन रुग्णवाढ झपाटय़ाने झाल्यास पालिका आणि राज्य सरकारसमोर आव्हान निर्माण होऊ शकते.

महत्त्वाचे

1 डिसेंबर रोजी दिवसभरात मुंबईत केवळ 108 रुग्णांची नोंद झाली होती, तर 29 डिसेंबर रोजी 2510 रुग्णांची नोंद झाली.
कोरोना स्थितीचा डॅशबोर्ड
n 11 मार्च 2020 रोजी पहिला रुग्ण सापडल्यानंतर आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 7 लाख 75 हजार 808
n आतापर्यंत 7 लाख 48 हजार 788 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली.
n कोरोनामुळे आतापर्यंत 16 हजार 375 जणांचा मृत्यू. यामध्ये 50 वर्षांवरील मृतांची संख्या 14008
n सक्रिय रुग्णांची संख्या 8060. यामध्ये 4352 जणांमध्ये लक्षणे नाहीत. 3551 जणांमध्ये लक्षणे असून 157 जण अत्यवस्थ.

असा झाला उद्रेक

n सक्रिय रुग्णांची संख्या 1904 वरून 8060 वर पोहोचली. सक्रिय रुग्णांमध्ये 29 दिवसांत 6156 इतकी रुग्णवाढ झाली.
n एकूण रुग्णांची संख्या 7 लाख 62 हजार 989 वरून 7 लाख 75 हजार 808 वर पोहोचली. 12819 रुग्णांची भर.
n रुग्णवाढीची सरासरी टक्केवारी 0.02 वरून 0.10 टक्क्यांवर पोहोचली.
n सील इमारतींची संख्या 16 वरून 45 वर, तर सील मजल्यांची संख्या 1320 वरून 5831 वर.