
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या रॅलीत अनेक कार्यकर्ते रामलीला मैदानात एकत्र आले आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी विश्व हिंदू परिषदेने सरकारवर दबाव बनवण्यासाठी ही रॅली आयोजित केली आहे. राम मंदिर निर्माणासाठी आम्ही सरकारकडे भीक मागत नाही, सरकारने याबाबत तातडीने कायदा करावा अशी मागणी या परिषदेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केली आहे. राम मंदिर निर्माणासाठी त्यांनी सरकारला कठोर शब्दांत इशारा दिला आहे.
न्यायालयाने प्रतिष्ठा जपावी. न्यायालयाने जनतेच्या भावनांचा सन्मान करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. न्याय व्यवस्था, न्यायालयाबाबत जनतेत विश्वास असायला हवा. न्याय मिळण्याबाबतच अविश्वास असेल असा देश प्रगती कशी करणार याचा विचार न्यायालयाने करत, यावर लवकरात लवकर निर्णय द्यावा, असेही ते म्हणाले. सत्ता मिळवण्यासाठी राम मंदिर निर्माणाची घोषणा करण्यात आली होती. आता सत्तेत असणाऱ्यांनी कोणतीही सबब न सांगता, विनासंकोच राम मंदिर निर्माणाची वाट मोकळी करावी असा इशाराही जोशी यांनी सरकारला दिला आहे.
आमचा कोणत्याही धर्माशी किंवा समाजाशी वाद नाही. या मुद्द्याला राजकारणाचा किंवा धर्माचा किंवा जातीचा मुद्दा करण्यात येऊ नये. देशावर आक्रमण करणाऱ्यांचे निशाण नष्ट करून स्वप्रतिष्ठा जपण्याचा हा मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या रॅलीसाठी देशभरातून अनेक कार्यकर्ते रामलीला मैदानात दाखल झाले आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर राजधानीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माणासाठी मोठ्या प्रमाणात संपर्क अभियान सुरू केले आहे. परिषेदेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि काही राज्यापालांना भेटून आपली मागणी त्यांच्यापुढे ठेवली होती. आता ठिकठिकाणच्या मंदिर आणि मठात अनुष्ठान आणि प्रार्थना करण्यात येणार आहेत. तसेच साधुसंतांची धर्म परिषदही घेण्यात येणार आहे. शेवटची धर्म परिषद 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला होणार आहे.






















































