
रशियाची राजधानी मॉस्कोहून गोव्यासाठी उड्डाण केलेले विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर धमकीचा ई-मेल दाबोलिम विमानतळ प्रशासनाला मिळाल्याने त्यांनी तत्काळ गोव्याच्या दिशेने येणारे प्रवासी विमान हिंदुस्थानच्या हवाई हद्दीत येण्याआधीच उझबेकिस्तानच्या दिशेने वळवल्याचे समोर आले आहे.
या विमानात तब्बल 240 प्रवासी होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मॉस्को-गोवा एझेडव्ही 2463 हे प्रवासी विमान आज पहाटे 4 वाजून 15 मिनिटांनी दक्षिण गोव्यातील दाबोलिम विमानतळावर उतरणार होते, मात्र मध्यरात्री 12.30 च्या सुमारास दाबोलिम विमानतळाच्या संचालकांना त्यांच्या ई-मेल आयडीवर विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आला. त्यामुळे विमान हिंदुस्थानच्या हवाई हद्दीत शिरण्याआधीच उझबेकिस्तानकडे वळवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.






















































