
फसवणुकीच्या गुह्यात अटक करण्याची प्रक्रिया सुरू करत असताना पळून जाताना उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घालून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
रोहन बाळासाहेब वाघमारे (रा. मोळाचा ओढा), रणजित भोसले (रा. कोंडवे, ता. सातारा) व विनोद विलास डेरे (रा. कवठे, ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. बँकेचे कर्मचारी विवेक कुमार सिंह (रा. भंडारी एजन्सी, देगाव फाटा) यांच्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
वाघमारे याने मंगळवार पेठ परिसरात रोहन हाइट्स नावाची अपार्टमेंट बांधण्यासाठी 2015 मध्ये स्टेट बँकेच्या प्रतापगंज पेठ शाखेतून एक कोटी 75 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याने 2018 पर्यंत कर्जाचे हप्ते भरले. त्यानंतर त्याने हप्ते देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱयांनी अपार्टमेंटची पाहणी केली असता बांधलेले फ्लॅट बँकेच्या परस्पर विकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुह्याच्या चौकशीसाठी उपनिरीक्षक बशिर मुल्ला यांनी त्याला आज चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीमध्ये तो सहकार्य करत नव्हता. त्यामुळे मुल्ला यांनी त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरु केली. त्यावेळी मुल्ला व हवालदार वाघमळे यांना धक्का देऊन तो चौकीतून बाहेर पळला. त्याच्या कारमध्ये बसून चालक भोसलेला पळून जाण्यास सांगितले. मुल्ला यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी त्यांच्या अंगावर गाडी घातली. दरम्यान, पोलिसांना संशयिताला पकडण्यात विनोद हा दुचाकीवरून अडथळा निर्माण करत होता. त्यामुळे ते दोघे पळून गेले, परंतु विनोद पोलिसांना सापडला. याबाबत खुनाचा प्रयत्न केल्याची फिर्याद मुल्ला यांनी दिली आहे.
































































