माजी महसूलमंत्री भाऊसाहेब वर्तक यांच्या कुटुंबाची जमीन हडप, तिघांवर गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वसई

काँग्रेसचे वसईतील एकेकाळचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री भाऊसाहेब वर्तक यांच्या कुटुंबाची 146 गुंठे जमीन हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट खरेदीखत तयार करून खोटे शिक्के तसेच नकली मुद्रांकाच्या आधारे सात-बाराही बनवला असून वर्तक कुटुंबाची सपशेल फसवणूक करण्यात आली. पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर तब्बल एक वर्षाने तिघा भामटय़ांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान याप्रकरणी आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी वर्तक यांच्या कुटुंबाने केली आहे.

भाऊसाहेब वर्तक हे 1972 मध्ये वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात महसूलमंत्री होते. त्यांनी त्या काळात अनेक गोरगरीबांना न्याय मिळवून दिला. आता त्यांच्याच कुटुंबीयांना न्यायासाठी झगडावे लागत आहे. भाऊसाहेब वर्तक व त्यांचे जवळचे नातेवाईक नरसिंह वर्तक, रघुनंदन वर्तक, हरिहर वर्तक, परशुराम वर्तक, महादेव वर्तक, पुरुषोत्तम शहा, अमृतलाल शहा व कांतीलाल शहा यांच्या नावे विरार पश्चिमेच्या आगाशी येथील सर्व्हे क्रमांक 233/1 अ ही दीड हेक्टर म्हणजे 146 गुंठे जमीन होती. या सर्वांच्या निधनानंतर महेश भोईर यांनी राजेश कामत व विजय पाटील यांच्या मदतीने पुळ मुखत्यारपत्राच्या आधारे बनावट खरेदीखत तयार केले.

जमिनीचे मूळ मालक हयात नसतानाही ते जिवंत असल्याचे भासवून सदर जागेचा सात-बारा उतारा महेश भोईर यांनी स्वतःच्या नावे केला. याबाबत आगाशी येथील दक्ष नागरिक अनिकेत वाढीवकर यांनी गेल्या वर्षी हे प्रकरण उघडकीस आणले होते. कोकण विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांकडेदेखील तक्रार करण्यात आली, तर विकास वर्तक यांनी गेल्या वर्षी 10 डिसेंबरला तिघांविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. महेश भोईर व त्यांच्या साथीदारांनी मृत व्यक्ती जिवंत आहेत असे भासविले आणि बनावट खरेदीखताची दस्त नोंदणी केली. त्यासाठी खोटे शिक्के, नकली मुद्रांक वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

झाडांच्या कत्तलीचाही गुन्हा
महेश भोईर व त्यांच्या साथीदारांनी वर्तक कुटुंबीयांची जमीन हडप केल्याचे उघडकीस येत असतानाच भोईर यांच्यावर यापूर्वी बारीवाडा गावातील तिवरांची बेसुमार कत्तल केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. जमीन हडप केलेल्यांना कठोर शिक्षा देऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी विकास वर्तक यांनी केली आहे.