
सामना प्रतिनिधी । पारनेर
वाळूतस्करी करणार्या विनाक्रमांकाच्या डंपरने दुचाकीस धडक देउन तिघांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. खडकवाडी पळशी रस्त्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दुचाकीस धडक देउन विनाक्रमांकाचा डंपर घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, वाळूउपशास छुपा पाठींबा देणार्या महसूल विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह हालू न देण्याचा पवित्रा स्थानिक नागरीकांनी घेत रास्ता रोको आंदोलन केल्याने उशिरापर्यंत मृतदेह रस्त्यावरच पडून होते.
पळशीच्या नागापूरवाडी येथील गोरख कोंडीबा मेंगाळ वय अंदोजे 40 हा आदिवासी तरूण कामटवाडी येथील खंडोबाच्या यात्रोत्सवासाठी दुचाकीवर आई बुधाबाई कोंडीबा मेंगाळ यांना घेउन गेला होता. यात्रोत्सवास भेट देउन परतताना खडकवाडी येथे वनकुटे येथील डॉ.डंबे यांची बहीण सुमन डंबे त्यांची भेट झाली. त्यांनाही पळशी येथे जायचे असल्याने गोरख याने त्यांनाही दुचाकीवर बसविले. तिघे खडकवाडी सोडून पळशीच्या दिशेने निघाले असता हुलावळे वस्तीनजीक पाठीमागून येणार्या वाळूतस्करी करणार्या विनाक्रमांकाच्या डंपरने दुचाकीस जोराची धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार एकेरी असलेल्या या रस्त्यावर डंपरचालक अतिशय वेगाने आपले वाहन चालवित होता. पुढे दुचाकी चाललेली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला आपल्या वाहनावर नियंत्रण आणता आले नाही. त्याने दुचाकीस जोराची धडक दिल्यानंतर तिच्यावरील तिघेही हवेत उडाले तर दुचारी रस्त्याच्या बाजूला जाउन पडली. त्या पाठोपाठ डंपरने तिघांनाही चिरडले व त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे तिघांचा बळी जाउनही डंपरचालकाने वाहन न थांबविता तेथून पळून गेले.
दुर्घटनेची माहीती समजल्यानंतर खडकवाडी तसेच पळशी येथील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. अवैध वाळू उपसा तसेच वाहतूकीविरोधात घोषणाबाजी करण्यात येउन पोलीस तसेच महसूलच्या भ्रष्ट प्रशासनाचा निषेध करण्यात आला. जोपर्यंत महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह हालवू न देण्याचा आंदोलकांनी पवित्रा घेतला त्यामुळे अपघातानंतर सुमारे तीन तास तीनही मृतदेह रस्त्यावरच पडून होते. घटनेनंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, निलेश लंके प्रतिष्ठाणचे सचिव अॅड. राहुल झावरे, पारनेरचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार हे घटनास्थळी दाखल झाले. उशिरापर्यंत मृतदेह हालविण्यासंदर्भात काहीही निर्णय झालेला नव्हता.

























































