
अर्जेटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना सुरू असताना मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. क्लबमध्ये आईवडिलांसोबत फुटबॉलचा सामना बघायला गेलेला चिमुकला पाचव्या मजल्यावरून पडल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. ह्यद्यांश राठोड (3) असे त्या चिमुकल्याचे नाव होते.
गरवारे क्लबमध्ये अवनीश राठोड हे त्यांची पत्नी व मुलगा ह्यद्यांश यांच्यासह सामना पाहण्यासाठी गेले होते. हे स्क्रिनिंग सहाव्या मजल्यावर होते. दरम्यान, रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ह्यद्यांशला लघुशंका लागल्याने तो एका मुलासोबत पाचव्या मजल्यावरील शौचालयात आला. तेथून पुन्हा सहाव्या मजल्यावर जात असताना तो जिन्याच्या मध्यभागी असलेल्या मोकळय़ा जागेतून तोल जाऊन खाली पडला.























































