
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी देवगड तालुक्यातील चांदोशी घाडीवाडी येथील महेश वसंत मेस्त्री (वय ३३) याला दोषी ठरविले आहे. यासाठी ३ वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता स्वप्नील सावंत यांनी काम पाहिले.
९ ऑक्टोबर २०१७ रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर १० रोजी त्याला अटक झाली होती. पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपी महेश मेस्त्री याने दुचाकीने पाठलाग करीत तिला अडविले. तसेच तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या दरम्यान, पाठून कोणाची तरी गाडी येत असल्याचे लक्षात आल्याने त्याने तिथून पळ काढला. यावेळी त्या मुलीसोबत अन्य दोन मुले शाळेत जात होती. या मुलीने हा प्रकार घरी सांगितला. प्रकार समजताच पीडित मुलीचे वडील व मुलीसोबत शाळेत जात असलेला एक मुलगा त्या ठिकाणी शोधायला आले असताना आरोपी महेश मेस्त्री तेथेच लपून बसल्याचे निदर्शनास आले.
त्याला पोलिसांच्या स्वाधीन करीत फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार त्याच्यावर भादंवि कलम ३५४ अ (१), (१) व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी महेश याने पीडित मुलगी १ ऑक्टोबर २०१७ रोजी बाजारात जात असतानाही तिचा पाठलाग केला होता. या प्रकरणाची विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून यात आरोपी महेश याने यासाठी वापरलेल्या दुचाकीने मालक प्रकाश मेस्त्री, पीडित मुली व पीडित मुली सोबत शाळेत जात असताना सोबत असलेला मुलगा अशा तिघांची साक्ष महत्वाची ठरली आहे. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक जी. व्ही. वारंग यांनी तपासीक अधिकारी म्हणून या प्रकरणात काम पाहिले.
































































