
वाघाने हद्दीच्या संघर्षातून वाघ आणि वाघिणीमध्ये झटापट झाली. या झटापटीमध्ये वाघ सरस ठरला असून त्याने वाघिणीचा खात्मा केला. अशा प्रकारचा संघर्ष जंगलासाठी नवा नाहीये, मात्र या झटापटीनंतर एक धक्कादायक आणि दुर्मिळ घटना घडली. वाघाने वाघिणीला ठार मारल्यानंतर तिच्या डोक्याकडचा भाग खाऊन टाकला आणि नंतरच तो तिथून निघून गेला. ही घटना बांधवगड व्याघ्र प्रकल्पात घडली आहे. मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.
वनकर्मचाऱ्यांचे एक पथक गस्त घालत असताना त्यांना धमोकार बफर झोनजवळ मेलेली वाघीण दिसली. त्यांनी वरिष्ठांना याबाबतची कल्पना दिली. वरिष्ठांनी वाघिणीच्या मृतदेहाची पाहणी केली आणि तिचा मृत्यू हद्दीच्या वादातून झाल्याचा निष्कर्ष काढला. ज्या ठिकाणी या वाघिणीचा मृतदेह सापडला होता त्याच्या 40-50 स्क्वेअप फुटाच्या परिसरात वाघाच्या पंजाचे ठसे सापडले आहेत. यावरून वाघिणीची वाघासोबत झटापट झाली होती हे दिसून येत असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ठसे नीट तपासले असता ते वाघिणीपेक्षा तरूण वाघाचे असल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मृत वाघिणीच्या खांद्याचं हाड हल्ल्यात मोडल्याचे व्याघ्र प्रकल्पाचे संचालक विन्सेंट रहीम यांनी सांगितले आहे.
वाघिणीला ठार मारल्यानंतर वाघाने तिच्या डोक्याकडचा भाग खाल्ल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. झटापटीमध्ये वाघिणीची कवडी फुटली होती आणि तिच्या शरिरावर बऱ्याच जखमाही दिसून आल्या. मोठ्या प्रमाणात झालेला रक्तपात सगळ्या गोष्टी वाघिणीचा झटापटीत मृत्यू झाल्याचे दर्शवतात असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. वाघिणीच्या उत्तरीय तपासणीमध्ये तिचे वय 3 वर्षांच्या आसपास असावे असे कळाले आहे. ही वाघीण तिच्या आईपासून काही महिन्यांपूर्वी वेगळी झाली होती.
जंगली जनावरांमध्ये वाघ आपल्या हद्दीवर आपलेच वर्चस्व रहावे यासाठी आक्रमकता बाळगणारा प्राणी आहे. वाघांची हद्द ही 5 किलोमीटरपासून 30 किलोमीटरपर्यंत असू शकते. वाघाचे वय, भक्ष्यांची संख्या आणि भौगोलिक परिस्थिती यावर वाघाच्या हद्दीचा परीघ अवलंबून असतो.



























































