
सामना प्रतिनिधी । मुंबई
वाहनाला धडकून किंवा शिकारीत किंवा दोन वाघांच्या भांडणात अनेक वाघांचा मृत्यू होत असलेल्या बातम्या केल्या काही महिन्यांपासून येत असतानाच आता प्राणीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात वाघांची संख्या 20 टक्क्यांनी वाढल्याचे उघड झाले आहे. 2018 च्या व्याघ्रगणनेत तब्बल 245 वाघ महाराष्ट्रात असल्याची नोंद झाली आहे. 2014 मध्ये ही संख्या 204 होती तर 2010 मध्ये एकूण वाघांची संख्या 183 होती. दरम्यान, 250 वाघांचे बछडेही महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहेत. त्यात दोन वर्षांच्या बछडयांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात मेळघाट, ताडोबा, पेंच, सह्याद्री, नवेगाव-नागझीरा, बोर इत्यादी ठिकाणी वाघांची संख्या मोठी आहे. राज्यात वाघांची शिकार होत असून वनविभाग त्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप प्राणीमित्रांकडून होत होता. त्यानतंर वनविभागाने जोरदार कामगिरी करत वाघांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने पावले उचलली.दरम्यान,आजवनमंत्री सुधीर मुनगंटीवारअध्यक्षतेखाली नागपूरात झालेल्या व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची नागपूरमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी वार्ताहारांना वाघांची संख्या वाढल्याबाबतची माहिती दिली. या बैठकीत या विषयाच्या अनुषंगाने अनेक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुरेसा निधी आणि कर्मचार्यांची भरती
वनविभागाला विविध योजना आखण्यासाठी पुरेसा निधी पुरवण्यात आला. त्याचबरोबरच कर्मचार्यांची भर्तीही करण्यात आली. विविध रिक्त जागा भरण्यात आल्या. त्यामुळे वनविभागाची विविध कामे मार्गी लागली. व्याघ्रगणनेसाठी विविध योजना राबवण्यात आल्या. वाघांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांची शिकार होऊ नये, जंगलात लावण्यात येत असलेले सापळे इत्यादींबद्दल वनअधिका-यांनी ठोस पावले उचलली. त्यामुळे वाघांच्या संख्येत वाढ होऊ शकल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.


























































