
सामना ऑनलाईन | समारा
सुपरस्टार नेमार मैदानात फुटबॉल खेळताना त्याच्या भावनांचे प्रदर्शन करणारच ,प्रत्येक खेळाडूची प्रतिस्पर्ध्याला चकवण्यासाठी एक रणनीती असते.नेमारने मेक्सिकोविरुद्ध मैदानात ड्रामेबाजी केली तर चुकले कुठे ,असा सवाल करीत ब्राझीलचे प्रशिक्षक टिटे यांनी नेमारच्या स्ट्रॅटेजीचे ठाम समर्थन केले आहे. नेमार मैदानात खेळापेक्षा ड्रामेबाजीला महत्व देणार असेल तर टे योग्य नाही. मेक्सिकोच्या लायुनच्या हाताचा ओझरता धक्का लागल्यावर मैदानात कळवळण्याचे नेमारचे नाटक मनाला पटत नाही अशी टीका मेक्सिकन प्रशिक्षक जुआन कार्लोस ओसारिओ यांनी केली होती.या टीकेला टिटे प्रत्युत्तर देत होते.
प्रत्येक संघ आणि खेळाडूची प्रतिस्पर्धी संघाला चकवण्याची एक रणनीती असते.नेमारने मैदानात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली असेल तर त्यावर एव्हढी टीकाटिप्पणी कशाला? असे विचारून टिटे म्हणाले, मेक्सिकोविरुद्धच्या लढतीत नेमार मैदानात विव्हळत पडला म्हणून ब्राझील आक्रमणापेक्षा बचावाला जास्त महत्व देतो हा ओसारिओ यांनी केलेला आरोप मला मुळीच मान्य नाही. नेमारने प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्रात चेंडू ड्रिब्बल करायचाच नाही का? याचे उत्तर टीकाकारांनी द्यावे. प्रतिस्पर्धी संघाच्या बचावपटूंना उकसवणे हा नेमारचा स्वभाव आहे .त्याला नाटकबाजी म्हणत असाल तर मला त्यावर बोलायचेच नाही .सुपरस्टार नेमार आक्रमक खेळाला अधिक महत्व देतो हे त्याच्या जगभरातील अब्जावधी चाहत्यांना ठाऊक आहे. त्यामुळे एखाद्या प्रसंगासाठी त्याच्या कामगिरीचे अवमूल्यन करणे चूकच ठरेल. कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही तसेच नेमारच्या खेळाचे आहे, हे कुणीतरी मेक्सिकन प्रशिक्षक ओसारिओ यांना समजवायला हवे अशीही पुस्ती टिटे यांनी पुढे जोडली.




























































