
थंडीने पुन्हा जोर धरलाय. अशा मोसमात लहान बाळांना सर्दी-खोकला चटकन होतो… आणि तो बरा होण्यास वेळ लागतो. . ही आपली चिमुकली बाळं सर्दीने बेजार होतात, चिडचिडी होतात. या साऱयाचा परिणाम त्यांच्या खाण्यावर होतो. अशावेळी तुमच्या बाळांना काय खायला द्याल…
दूध (6 महिन्याच्या बाळांसाठी)
सर्दी झाल्यास बाळाची प्रकृती नाजूक बनते. म्हणून शक्यतो बाळाला सर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी आईने थंड पदार्थ खाऊ-पिऊ नयेत, म्हणजे बाळाला सर्दी होणार नाही. त्यातूनही सर्दी झालीच आईचे दूधच द्यायचे. आईच्या दुधात अँटीबॉडीज असतात. त्यामुळे सर्दीवर हाच रामबाण उपाय आहे.
भाताच्या पाण्याचे सूप (6 ते12 महिने)
भाताचे पाणी प्याल्याने बाळांची रोगप्रतिकार क्षमता वाढते. 2 चमचे तांदूळ, अर्धा कप पाणी घेऊन भाताला पूर्ण मऊ बनवा. नंतर एका भांडय़ात कुस्करून त्याचे सूप बनवा आणि बाळाला चमच्याने पाजा.
हळदीचे दूध (1 वर्षापेक्षा मोठे)
1 वर्षापेक्षा मोठय़ा बाळासाठी हळदीचे दूध देता येईल. हळदीचे दूध नैसर्गिक अँटीबायोटिकचे काम करते, सर्दीला दूर करते आणि घसाही साफ करते आणि जर तुमचे बाळ अगोदरपासूनच अँटीबायोटिक घेत असेल तर एकदा डॉक्टरांना विचारून घ्या.
निरनिराळे सूप (1.5 वर्षाच्या पुढे)
काही वेळा बाळाला संसर्ग झालाच तर त्याची खाण्याची इच्छा राहात नाही. पण त्यांना खाऊ घालणे महत्त्वाचे असतेच शिवाय ते पौष्टिक, स्वच्छही हवे. अशावेळी बाळाला सूप देणे हा सर्वात आणि छान उपाय आहे. यासाठी भाज्या, सफरचंद, गाजर, टोमॅटोचे सूप बाळाला देऊ शकता.
डाळिंबाचा रस (6 महिन्यापेक्षा जास्त)
डाळिंबात भरपूर अँटिऑक्सिडंट असतात. डाळिंबाचा रस सर्दीला दूर करण्याचा व बाळालाही नवीन खाऊ घालण्यासाठी उत्तम आहे. डाळिंबाच्या या रसामध्ये जर आले आणि काळीमिरी टाकली तर बाळाला सर्दीपासून दूर ठेवता येईल. डाळिंबामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
गाजराचा रस (6 महिन्यांपेक्षा मोठे)
गाजर रोगप्रतिकार क्षमतेसाठी लाभदायक आहेच. शिवाय खायलाही हलके आणि पाचक आहे. त्यामुळे गाजराचा ज्यूस बाळाच्या सर्दीसाठी उपयोगी ठरेल. गाजराचा रस करून बाळाला पाजल्यास किंवा नुसती कच्ची गाजरे किस करून खायला दिल्यास आतडी स्वच्छ होऊ शकतात.
सफरचंद कुस्करून द्यावे (6 ते 9 महिने)
सफरचंदात खूप पौष्टिक घटक असतात. आणि ते पचायलाही हलके असते. सफरचंदाला सोलून घ्यावे आणि आतला भाग काढून घ्यावा. जमल्यास त्या सफरचंदाच्या फोडीला वाफ देऊन मऊ करून घ्यावे. नंतर मिक्सरमध्ये टाकून ते मिक्सचर काढून घ्यावे. त्याची तुम्हाला पुरी करता येईल किंवा कुस्करूनसुद्धा देऊ शकता. सर्दीवर खूप चांगला उपाय आहे.
कुस्करलेला बटाटा (8 महिन्यांपेक्षा मोठे)
बटाटा उकडून नंतर सोलून घ्यावा. पूर्ण मऊ करून तो कुस्करून बाळाला खाऊ द्यावा. यात कर्बोदके असतात. शिवाय बाळाच्याही तोंडाला यामुळे चव येते.
मध आणि कोमट पाणी (8 महिन्यांपेक्षा मोठे)
मध घशाला खूप लाभदायक असते. लेमन टीमध्ये मध मिसळायचा आणि त्यात कोमट पाणी घालून हळूहळू बाळाला पाजले की, त्याच्या घशाला आराम मिळेल.
भाज्यांची खिचडी (1 वर्षापेक्षा जास्त)
खिचडी पचायला हलकी आहे. ती पटकन शिजतेही. खिचडीमध्ये गाजर, टोमॅटो, काही सकस भाज्या टाकायच्या. यामुळे बाळाचे परिपूर्ण पोषण होते.


























































