
मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे रविवारी मुंबई शहरात आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय लोक अदालत’मध्ये एकूण 402 कोटींची 9979 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. प्रधान सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम, मुख्य सरकारी वकील जयसिंग देसाई यांनी वृक्षाला जलअर्पण करून या लोक अदालतचे उद्घाटन केले.
राष्ट्रीय लोक अदालतच्या उपक्रमा अंतर्गत संपूर्ण शहरात 86 पॅनलची स्थापना केली होती. या पॅनलपुढे दिवाणी, फौजदारी, मोटर अपघात, बँक, एमएसईबी, बेस्ट, अदानी, आयडिया- व्होडाफोनशी संबंधित प्रकरणे ठेवली होती. दिवसभरात लोक अदालतमध्ये प्रलंबित 45331, तर दाखलपूर्व 80791 अशी एकूण 126122 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित 8345 व दाखलपूर्व 1634 अशी एकूण 9979 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. लोक अदालतच्या अनुषंगाने मुख्य महानगर दंडाधिकारी व महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. यादरम्यान 24 एप्रिल ते 29 एप्रिल या पाच दिवसांत 10318 प्रकरणे निकाली निघाली, अशी माहिती मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अनंत देशमुख यांनी दिली.


























































