
स्थानिक गुन्हे शाखेने ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरणाऱ्या आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ट्रॅक्टर हेड आणि ट्रॉलीसहित गुन्हा करताना चोरट्यांनी वापरलेली एक स्कॉर्पिओ गाडी असा 11 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस ठाणे, उदगीर ग्रामीण हद्दीमधून ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरी झाल्याच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजे, झोला तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे राहणारा श्रीहरी सुर्यकांत मुरकुटे (41) याला गंगाखेड ते पालम रोडवरून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर हेड व ट्रॉलीसह ताब्यात घेण्यात आले.
याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता तीन साथीदारांच्या साहाय्याने गुन्हा केला असल्याचे त्याने सांगितले. गुन्ह्यात चोरलेला ट्रॅक्टर, हेड-ट्रॉली आणि वापरलेली स्कॉर्पियो गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास उदीर ग्रामीण पोलीस करत आहेत. स्थानिक गुन्ह्याचा शोध गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, सायबरचे पोलीस अमलदार राजेश कंचे, प्रदीप स्वामी, रियाज सौदागर, चालक नागनाथ जांभळे यांनी लावला.


























































