सिंधुदुर्गातील व्यापारी काळे झेंडे फडकवणार, ‘जीएसटी’ जाचक आंदोलनाला पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जीएसटी कायद्यातील जाचक तरतूदी व अधिकाऱ्यांच्या मनमानीला पोषक ठरणाऱ्या नव्या तरतुदींच्या विरोधात व्यापाऱ्यांच्या ‘कॅट’ या देशपातळीवरील तसेच महाराष्ट्र चेंबरसह अन्य संघटनांनी शुक्रवार 26 फेब्रुवारी रोजी भारत बंद आंदोलन पुकारले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने कॅटच्या या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेट्ये यांनी दिली.

दरम्यान, सिंधुदुर्ग व्यापारी संघाने नुकतेच 31 जानेवारीला एकता मेळाव्याच्या निमित्ताने बंद पाळून आपल्या एकजुटीचे प्रदर्शन सिंधुदुर्गातील व्यापारी बांधवांनी केलेले असल्याने पुन्हा बंद न पाळता 26 फेब्रुवारीला सर्व व्यापाऱ्यांनी काळ्याफिती लावून आणि आपल्या दुकानांबाहेर काळे झेंडे लावून जीएसटी कायद्यातील जाचक तरतूदींविरोधी आंदोलनात सहभागी व्हावे, असा निर्णय महासंघाने घेतला आहे.

या दिवशी सर्व तालुका संघटना आपापल्या तहसीलदारांना निवेदने सादर करतील आणि जिल्हास्तरावर सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हा मुख्यालयात महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले जाईल, मात्र ज्या सभासदांना आपली दुकाने स्वेच्छेने बंद ठेवून आंदोलनात सहभागी व्हायचे आहे त्यांना तसे करण्याची पूर्ण मोकळीक आहे.

सर्व व्यापारी बांधवांना विनंती आहे की, येत्या शुक्रवारी 26 फेब्रुवारी रोजी आपल्या दुकानांच्या बाहेर काळे झेंडे आणि आपल्या दंडावर काळ्या फिती लावून जीएसटी कायद्यातील जाचक तरतुदींच्या विरोधात आपला असंतोष व्यक्त करावा, असे आवाहन व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेट्ये यांनी केले आहे.