
मुंबईसह राज्यातील पारंपरिक सुवर्णकार सद्यस्थितीत मोठय़ा अडचणीत सापडले असून त्यांना आता सरकारच्या आर्थिक सहकार्याची आवश्यकता असल्याने राज्य सरकारने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे अध्यक्ष प्रवीण जुवाटकर यांनी केली.
नुकतीच मुंबई मराठी पत्रकार संघात महाराष्ट्र सुवर्णकार सेनेची पत्रकार परिषद पार पडली. या वेळी सुवर्णकारांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. सोन्यापासून दागिने निर्माण करण्याचे काम मोठमोठय़ा फॅक्टरी आणि मोठमोठय़ा उद्योगांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होऊ लागले. त्यामुळे जे छोटे घरगुती सोनार होते ज्यात पेढी घालून बसलेल्या पारंपरिक सोनारांचे प्रमाण मोठे असल्याने सर्वात जास्त फटका त्यांनाच बसला आहे. या पार्श्वभूमीवर आमच्या व्यवसाय उत्कर्षाकरिता सोने खरेदीसाठी सरकारने भांडवल उपलब्ध करून द्यावे, अशी मुख्य मागणी सुवर्णकारांनी केली. सद्यस्थितीत सरकारकडून असे कोणतेही नियोजन केले जात नाही. बँका किंवा आर्थिक फायनान्स पंपनीकडून आर्थिक मदत कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जात नाही, असे प्रवीण जुवाटकर यांनी या वेळी सांगितले. संघटनेचे सचिव गंगाराम सागवेकर, संजय नागवेकर, नंदकिशोर वळीवडेकर आदी या वेळी उपस्थित होते.


























































