
मुंबई गोवा महामार्गावरील भरणे, लवेल आणि लोटे या ठिकाणी सुरु असलेल्या ओव्हरब्रिजच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. ओव्हरब्रिजचे काम सुरु असलेल्या ठिकाणी तयार करण्यात आलेले पर्यायी मार्ग धोकादायक असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या वेगात सुरु आहे. कशेडी ते परशुराम घाट या दरम्यानच्या 43.8 किलोमिटरच्या रस्त्याच्या कामाचा ठेका कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने घेतला आहे. या दरम्यानचा अवघड भोस्ते घाट फोडून क्राँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र मध्येच 200 मीटरचे काम राखून ठेवल्याने हे अंतर पार करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
काही ठिकाणी ओव्हरब्रिजच्या कामांना सुरवात करण्यात आली आहे, त्या ठिकाणचे पर्यायी मार्ग पक्के डांबराचे तयार करणे गरजेचे होते. तसे केले असते तर वाहतुकीची कोंडीही झाली नसती आणि अपघातांचा धोकाही नसता. मात्र ठेकेदार कंपनीने पर्यायी मार्गाचे डांबरीकरण न करता हे मार्ग दगड-मातीचे तयार केले आहेत. या कच्चा रस्त्यावरून अवजड वाहनांमुळे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे.
भरणे नाका येथील परिस्थितीती तर दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भरणे येथील ओव्हरब्रिजचे काम गेली दोन वर्षे सुरु आहे. हे ठिकाण बाजारपेठेचे असल्याने इथे नेहमीच पादचारी, वाहनांची मोठी गर्दी असते, मुंबई गोवा महामार्गावरून धावणारी वाहने इथूनच धावत असतात. त्यामुळे या ठिकाणी वन-वे वाहतुक सुरु ठेवणे आवश्यक होते. मुंबईकडे जाणारी वाहतुक दुकानांच्या बाजूने तर गोव्याकडे जाणारी वाहतुक पेट्रोलपंपाकडून वळविणे गरजेचे होते. मात्र, दोन्ही बाजुची वाहतुक दुकाने असलेल्या बाजुनचे सुरू ठेवण्यात आल्याने इथे दिवसभर वाहनांची कोंडी झालेली पहावयास मिळत आहे.
खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी या ठिकाणचा अपघाताचा धोका ओळखून तीन ते चार कर्मचारी वाहतूक नियंत्रणासाठी तैनात केले आहेत. मात्र या महामार्गावर वाहनांची वर्दळच इतकी आहे की वाहतुकीला नियंत्रित करताना या कर्मचाऱ्यांची तारांबळ होत आहे. लोटे येथे ज्या ठिकाणी ओव्हरब्रिजचे काम सुरु आहे त्या ठिकाणीही मार्केट आहे. त्यामुळे इथेही मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. अपघातांचा धोका इथेही आहे, त्यामुळे संबधित ठेकेदार कंपनीने ज्या ज्या ठिकाणी ओव्हरब्रिजचे काम सुरु आहे त्या त्या ठिकाणच्या पर्याय मार्गाचे डांबरीकरण करावे अशी मागणी होत आहे.
































































