वाहतूक पोलिसाला पेटविण्याचा प्रयत्न, मोहोळमध्ये दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

दंडाची रक्कम भरण्यास सांगितल्याच्या रागातून दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना मोहोळ शहरात घडली आहे. याप्रकरणी संबंधित वाहनचालकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाधान वामन ढावरे (वय 30, रा. तांबोळे रोड, मोहोळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून, मोहोळ वाहतूक शाखेचे पोलीस रविवारी शहरातील शिवाजी चौक आणि पंढरपूर रोड परिसरात विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत होते. यावेळी समाधान ढावरे हा मास्क न घालता जात असल्याने पोलीस नाईक विठ्ठल पठाडे यांनी पावती करण्यास सांगितले असता, तो पोलिसांबरोबर हुज्जत घालू लागला.

यावेळी त्याने पठाडे यांना तुमच्या अंगावर पेट्रोल टाकतो व मीही पेटवून घेतो, अशी धमकी देऊन गोंधळ घातला. याप्रकरणी पोलीस नाईक पठाडे यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार समाधान डावरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोज रोज पावतीसाठी पाचशे रुपये देणे मला जमणार नाही. पठाडे हे सतत पावती देत असल्याने मी चिडलो होतो. दारूच्या नशेत नकळत माझ्याकडून पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या