
केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यातील वेंगारा निर्वाचन मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेली ट्रान्सजेंडर अनन्या कुमारीने निवडणूकीतून माघार घेतली आहे. अनन्याने तिचा पक्ष डेमोक्रेटीक सोशल जस्टिस पार्टीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला.
पक्षातील नेत्यांनी माझा मानसिक छळ केला. ते मला जनतेसमोर ट्रान्सजेंडर म्हणून नाही तर वेश्या म्हणून जनतेसमोर आणलं. हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. मी ट्रान्सजेंडर लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रचारात मला माझं मत मांडू दिलं जात नाहीए. मला सतत प्रतिस्पर्धी उमेदवाराबाबत वाईट बोलण्यासाठी भाग पाडलं जात आहे. एलडीएफवर टीका करायला सांगितली जात आहे. मी एक अशी व्यक्ती आहे जिला स्वत:चे विचार आहेत. मी त्यांचं ऐकत नव्हते त्यामुळे ते मला सतत धमक्या द्यायचे. काही वेळा तर वाद झाल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देखील दिली गेली आहे, असा आरोप अनन्या हिने केला आहे.
अनन्या कुमारी केरळमधील पहिली ट्रान्सजेंडर रेडिओ जॉकी आहे. तिने वृत्तवाहिनीवर सूत्रसंचालक म्हणून देखील काम केले आहे. तसेच काही काळ ती चित्रपटसृष्टीत मेकअप आर्टिस्ट म्हणून देखील काम केले आहे.




























































