भटकंती- सह्याद्रीच्या कुशीतील लोहगड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<<प्रभाकर पवार>>

[email protected]

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून बळकट केलेला लोहगड किल्ला स्वराज्याच्या सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो. जागतिक वारसा यादीत समावेश झालेल्या लोहगडाची ही भ्रमंती. 

अलीकडेच सह्याद्रीच्या कुशीत दिमाखात उभ्या असलेल्या ‘लोहगड’ किल्ल्याला भेट देण्याचा योग आला. तेव्हा माझ्यासोबत शरद चांदोरकर, राजन शेलार व राजू बांदेकर हे माझे जिवलग मित्र होते. 3 हजार 389 फूट उंचीवर असलेल्या या ऐतिहासिक किल्ल्याला भेट देण्यासाठी आम्हाला 300 दगडी पायऱ्या चढायच्या होत्या तेव्हा डोक्यावर सूर्य आग ओकत होता. आमच्या अंगाची लाहीलाही झाली होती. अंगावरून नुसत्या घामाच्या धारा वाहत होत्या तरीही आम्ही हार मानली नाही. तासाभरात गड चढलो आणि तेथील भव्य मजबूत दरवाजे पाहून थक्क झालो. गडावर शिवमंदिर, जुन्या गुहा, पिण्याच्या पाण्याचे तलाव, किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस असलेला लांब आणि नागमोडी आकाराचा कडा. त्याला विंचू काटा म्हणतात. ढगांना स्पर्श करणारे भक्कम तट. पावसाळय़ात तर हा परिसर हिरव्या शालीने नटलेला असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून बळकट केलेला हा किल्ला स्वराज्याच्या सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो. दगड-मातीचा हा किल्ला शिवकालीन पराक्रमाची आठवण करून देतो.

महाराष्ट्रात सुमारे 500 च्या वर गडकिल्ले आढळतात, परंतु लोहगड हा महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक असा महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला 1564 साली निजामशाहीच्या ताब्यात होता. त्यानंतर तो आदिलशाहीच्या ताब्यात गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1644 साली जिंकला, परंतु पुरंदरच्या तहानंतर तो मुगलांकडे गेला. 5 वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड पुन्हा जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीचा खजिना लोहगडमधील गुहांमध्ये सुरक्षित ठेवला होता असे मानले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले व दुरुस्तही केले. रायगड (महाराजांनी राजधानी), प्रतापगड, सिंधुदुर्ग व राजगड हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत. इतिहासकारांच्या मते 300 ते 350 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. त्यापैकी लोहगड हा अत्यंत मजबूत किल्लाही होता. लोहगड हा आजही चांगल्या स्थितीत आहे. नवशिक्या ट्रेकरसाठी व पामिलीसाठी लोहगड किल्ला एकदम बेस्ट आहे, परंतु पर्यटकांना तेथे कोणत्याच प्राथमिक सुविधा मिळत नाहीत. युनेस्कोने लोहगडचा जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे. अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून यूएनईएससीओने मान्यता दिली आहे, परंतु महाराष्ट्र राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने लोहगड किल्ल्याकडे दुर्लक्ष केले आहे. पुरातत्व खाते म्हणजे ऐतिहासिक वास्तू, किल्ले, लेणी, शिलालेख, नाणी, अवशेष यांचे जतन व संवर्धन, संशोधन आणि संरक्षण करणे होय. परंतु लोहगड येथे कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या किल्ल्यावर पडलेल्या दिसतात. तेथे एक पोलीस 12 तास बंदोबस्ताला असतो.

लोहगड येथील भाजे गावचे सरपंच प्रमोद बहिकर म्हणाले, आम्ही लोहगड येथील अस्वच्छता व असुरक्षितेबाबत लेखी कळवून सुविधा पुरविण्याची विनंती केली आहे. लोहगड हा चढण्या-उतरण्यासाठी लहान मुलांना व महिलांनाही सोपा आहे. त्यामुळे सुट्टीच्या काळात लोहगडला हजारो पर्यटकांची गर्दी होते, परंतु आमच्या विनंतीला लोहगड किल्ल्याचे युनेस्कोच्या यादीत नोंद घेऊनही कुणी लक्ष देत नाही, अशी खंत प्रमोद बहिकर यांनी व्यक्त केली.