
अभ्यासू, शिक्षणप्रेमी आणि लढवय्या नेता गमावला, अशा शब्दांत सर्वपक्षीयांनी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना आदरांजली वाहिली. गेल्या मंगळवारी मडाडेश्वर यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वांद्रे पूर्व विधानसभेच्यावतीने सांताक्रूझ पूर्व बिल्लवा भवन येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाडेश्वर यांची पत्नी व माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर, मुलगी प्रांजल आणि मुलगा प्रसाद उपस्थित होते.
महाडेश्वर यांच्या आठवणींना उजाळा देताना विभागप्रमुख-आमदार ऍड. अनिल परब म्हणाले, महाडेश्वर आणि पालिका एक समीकरण होते. विधान परिषदेत मला पालिकेच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करायचे. मुंबईचा तसेच शिक्षणाचे प्रश्न विचारा असा त्यांचा आग्रह असायचा. त्यांचा अभ्यास, वाचन दांडगे होते. ओबीसीमध्ये वैश्य वाणी समाजाला स्थान मिळण्यासाठी त्यांनी लढा दिला.
माजी खासदार हुसेन दलवाई, विभागप्रमुख-आमदार रमेश कोरगावकर, विधानसभा संघटक सदा परब, माजी नगरसेवक मनोहर चौकर, शिवसेनेचे प्रवत्ते-माजी नगरसेवक रवी भोसले, विभाग संघटक राजुल पटेल, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, माजी नगरसेवक चंद्रकांत पवार, अनिल त्रिवेदी, काँगेसचे ज्येष्ठ नेते शिवाजी सिंह, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, राजू समेळ, भाजपचे लोकेश मालुसरे, दशरथ शिंगाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनेश लंगोटे, सुवर्णा आदींनी महाडेश्वर यांना आदरांजली वाहिली.


























































