
पश्चिम बंगालच्या संदेशखलीमध्ये महिलांचे लैंगिक शोषण करणे आणि जमीन बळकावणे असे आरोप असलेला तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहां शेखला अखेर अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बशीरहाट न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या 57 दिवसांपासून फरार असलेल्या शाहजहांला पोलिसांनी आज सकाळी नॉर्थ 24 परगनाच्या मीनाखान येथून अटक केली. दरम्यान, तृणमूल काँग्रेसने शाहजहां शेखला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे, अशी माहिती पक्षाचे नेते डेरेक ओब्रायन यांनी दिली.
रेशन भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी 5 जानेवारीला ईडीचे अधिकारी शाहजहां शेखच्या संदेशखली येथील घराची झाडाझडती घेण्यासाठी पोहोचले होते. परंतु ईडी अधिकाऱयांना ग्रामस्थांनी गावात येऊ दिले नाही. त्यानंतर या ठिकाणी हिंसाचार उफाळला. ईडी अधिकाऱयाला ग्रामस्थांनी जबर मारहाण केली. त्यांचे डोके पह्डले, गाडय़ांची नासधूस केली. यामागे शहाजहां शेखचा हात आहे, असे सांगत पोलिसांनी शहाजहां शेखचा शोध सुरू केला होता. परंतु तपास करूनही सापडत नसल्यामुळे अखेर पोलिसांनी शाहजहांला फरार म्हणून घोषित केले होते.
























































