तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव असलेले राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे, मात्र पुढील आदेश येईपर्यंत त्यांना प्रतिक्षा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या दरम्यान शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर त्यांची नियुक्ती होणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. कारण शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी भाग्यश्री बानायत यांची विदर्भ स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सेक्रेटरीपदी निवड झाली आहे.

शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भाग्यश्री बानायत यांची नियुक्ती झाली होती. गेल्या दीड वर्षांमध्ये त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले होते. काही ठिकाणी ग्रामस्थ व प्रशासन यांच्यामध्ये दरी निर्माण झालेली होती, त्यामध्ये मार्ग काढून शिर्डी देवस्थानचा कारभार कशा पद्धतीने चांगल्या हाताचा येईल या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. देवस्थानामधली प्रशासकीय शिस्तही त्यांनी चांगल्या पद्धतीने लावली होती. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.

तर दुसरीकडे राज्यामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून कडक शिस्तीचे ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाई मोहीम राज्यभरामध्ये आरोग्य विभागात सुरू केली होती. त्यांची अचानकपणे पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. दुसरीकडे भाग्यश्री बानायत यांची विदर्भ स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सेक्रेटरीपदी निवड झाली आहे. त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

”मला शिर्डी या ठिकाणी श्री साईबाबा देवस्थानमध्ये बाबांच्या ठिकाणी मला सेवा करण्याची एक प्रकारे संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते. प्रशासकीय पातळीवर जे जे काही चांगले उपक्रम राबवता येईल राबवले आहेत. मी मूळची नागपूरची असून मला आता घरी जायला मिळाले आहे, शिर्डी या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी मिळाली यातच मी आनंद मानते”, असे ‘दैनिक सामना’शी बोलताना त्या म्हणाल्या.