
दुर्मिळ कासवांची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी दोघांना वन विभागाने ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. श्रीकृष्ण अवधूत वंजारी आणि अथर्व शशिकांत देशमुख (रा.पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वाकड परिसरात मानकर चौकात बेकायदेशीररित्या कासव विक्री करणारे येणार असल्याची माहित वन विभागास मिळाली होती. त्यानंतर काही वेळातच एक व्यक्ती परिसरात दुचाकीवरून आली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने त्या व्यक्तिचा पाठलाग करून श्रीकृष्ण वंजारी आणि अथर्व देशमुख यांना अटक केली. त्यांच्या घराची झडती घेतली असता एका बॉक्समध्ये दोन कासव मृत अवस्थेत व एक जिवंत आढळून आले. त्यांची तपासणी केली असता एक इंडियन टेंट टर्टल व दोन इंडियन रुफड टर्टल या प्रजातीची असून ती दुर्मिळ व संरक्षित आहे. त्यानुसार आरोपींवर अवैधरित्या कासव बाळगल्याप्रकरणी आणि खरेदी-विक्री केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या परिशिष्टातील अनुसुची एकनुसार जप्त करण्यात आलेले कासव हे दुर्मिळ आणि संरक्षित आहे. आरोपींना पिंपरी-चिंचवड येथील मोरवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाल्याची माहिती पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली आहे.




























































