फेक न्यूज रोखणे महाकठीण; ट्विटरच्या सीईओंची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ट्विटर आपल्या सोशल साइटवरून फेक न्यूज प्रसारित होऊ नये यासाठी कटिबद्ध आहे; परंतु अशाप्रकारच्या बातम्या रोखण्याचा कुठलाही एक ठोस मार्ग नाही. त्यामुळे त्यांना रोखणे अत्यंत कठीण असल्याची स्पष्ट कबुली ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोरसी यांनी दिली. हिंदुस्थानात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डोरसी हिंदुस्थानात आले आहेत.

आयआयटी, दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात डोरसी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. हिंदुस्थानात ट्विटर वापरणाऱयांची संख्या मोठी आहे. हिंदुस्थानातील अनेक राजकीय नेतेही या प्लॅटफॉर्मचा मोठय़ा प्रमाणावर वापर करतात. मतदारांशी सातत्याने संपर्क करण्यासाठी हे नेते ट्विटरवरून आपल्या कामांची तसेच इतर माहिती प्रसारित करत असतात. त्यामुळे ट्विटर हिंदुस्थानला आपली सर्वात मोठी बाजारपेठ मानते. परंतु, सध्या हिंदुस्थानात सोशल मीडियावरून मोठय़ा प्रमाणावर फेक न्यूज प्रसारित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत डोरसी यांचे हिंदुस्थानात येणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, यावेळी डोरसी यांनी काँग्रेस अध्यक्ष रारुल गांधी यांचीही भेट घेतली.

हे तर संबंधित कंपनीचे काम

फेक न्यूज किंवा चुकीच्या सूचनांना कुठल्या एका प्रकारात टाकता येणार नाही. जर एखादी बातमी खोटी किंवा बनावट असल्याचे आढळले तर अशा बातम्या किंवा सूचना वेगळय़ा करून त्या प्रसारित होऊ न देणे ही संबंधित सोशल मीडिया कंपनीची जबाबदारी असल्याकडे डोरसी यांनी लक्ष वेधले. फेक न्यूजमध्ये नेमके काय लिहिले आहे, त्याच्यामागचा हेतू काय आहे हा मुद्दाही समजून घेणे गरजेचे असल्याचे डोरसी यांनी सांगितले.