
पैशांची मागणी करूनही देत नसल्याने तिघांची सटकली. त्यांनी सोबत आणलेल्या तलवारीने वाहनांची तोडफोड करून मोटार ड्रायव्हिंग ट्रेनरवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मानखुर्दच्या पीएमजीपी कॉलनीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोनू, माथाडी या दोघा आरोपींना अटक केली आहे, तर तिसरा आरोपी तोडफोड याचा शोध सुरू आहे.
रमेश चौहान (40) असे ड्रायव्हिंग ट्रेनरचे नाव असून तो पीएमजीपी कॉलनीतील त्याच्या मामा मोटार ड्रायव्हिंग स्कूल सेंटरमध्ये बसलेला असताना राहुल यादव ऊर्फ माथाडी, आय्यान शेख ऊर्फ तोडपह्ड आणि रोहित गुप्ता ऊर्फ सोनू असे तिघे तेथे गेले. सोबत ते तलवारी घेऊन तेथे गेले. तिघांनी रमेश चौहान यांच्याकडे पैशांची मागणी केली, पण चौहान यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींची सटकली आणि माथाडी याने चौहान यांच्या डोक्यात तलवारीने वार केले. तसेच चौहान यांच्या खिशातील 530 रुपये काढून घेतले. त्यानंतर चौहान यांना धमकी देत आरोपींनी तेथून काढता पाय घेतला. याप्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी माथाडी (19) आणि सोनू (18) या दोघांना अटक केली. तिसरा आरोपी तोडफोड याचा पोलीस शोध घेत आहेत.


























































