कारमधून 30 लाखांची बॅग लंपास, ठाण्यातील लुटारूंची आंतरराज्य टोळी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

पैठण येथील प्रसिद्ध रेशनिंग व्यापारी मनोज गटकाळ यांच्या कारची काच फोडून 30 लाखांची रोकड लंपास करणाऱया ठाणे येथील अट्टल गुन्हेगाराच्या आंतरराज्य टोळीतील एका रोखपाल महिलेसह दोघांना संभाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून पाच लाखांची रोकड, दहा मोबाईल आणि गुह्यात वापरलेली कार असा एकूण सव्वाबारा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. मुख्य आरोपी सॅम्युअल परेरा हा त्याच्या दोन साथीदारांसह फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, न्यायालयाने दोघांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

शिवाजीनगरातील साईनाथ ग्रेन ट्रेडर्सचे सतीश कैद्य हे शासनाचे रेशनवरील मालाचे वाहतूक कंत्राटदार आहेत. त्यांच्या मित्राने 3 नोव्हेंबर रोजी दुपारी एमआयडीसी वाळूज येथील बँकेतून 30 लाखांची रोकड काढून मनोज गटकाळ यांना दिली होती. गटकाळ यांनी 30 लाखांची रोकड बॅगेत ठेवून ही बॅग कारमध्ये आणून ठेवली होती. कार एपीआय कॉर्नर, भारत बाजारच्या पुढील फंक्शन हॉलच्या समोर उभी करून ते घरात गेले असता चोरटय़ांनी कारची (एमएच 20 – ईई – 2121) काच फोडून 30 लाखांची बॅग लंपास केली होती. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी विनय रामेश्वर राणासह पुष्पा सॅम्युअल परेरा या दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून पाच लाखांची रोख रक्कम, दहा मोबाईल, गुन्हय़ात वापरलेली कार असा एकूण सव्वाबारा लाखांचा ऐवज जप्त केला.