कारमधून गांजा विकण्यासाठी निघालेल्या दोघांना अटक, सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नगर येथे कारमधून गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. नगर-पाथर्डी रोडवर बाराबाभळी शिवारात ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 25 हजार रुपये किमतीचा 4 किलो 955 ग्रॅम गांजा, 65 हजारांचे दोन मोबाईल व 5 लाखांची कार असा 5 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वसीम मुजाहीद शेख (वय 34, रा. बेलेश्वर कॉलनी, विजय लाइन चौक, भिंगार) व अजय ऊर्फ सोनू रामचंद मुदलीयार (वय 32, रा. सिटीझन कॉलनी, विजय लाईन चौक, भिंगार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

बाराबाभळी परिसरात नगर-पाथर्डी रोडवर निळ्या रंगाच्या कारमध्ये दोन इसम गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिसांनी सापळा लावला. संशयित कार येताच पोलिसांनी वसीम मुजाहीद शेख व अजय ऊर्फ सोनू रामचंद मुदलीयार यांना ताब्यात घेतले.

कारची झडती घेतली असता डिक्कीमध्ये ओला व सुका गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, कार, मोबाईल असा सर्व मुद्देमाल जप्त केला. अंमलदार अजय नगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक देशमुख करीत आहेत.

सहायक निरीक्षक देशमुख, उपनिरीक्षक किरण साळंके, अंमलदार रमेश वराट, कैलास सोनार, राजू वैरागर, नगरे, गोविंद गोल्हार, विलास गारुडकर, रघुनाथ कुलांगे, राहुल द्वारके, सचिन धोंडे, संतोष आडसूळ, अरुण मोरे, समीर शेख, होमगार्ड साबीर शेख यांनी ही कारवाई केली.