
उत्तर प्रदेशच्या गाझियाबदमध्ये एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. या रुग्णाला दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात हलवण्यात आले आहे. एक आठवड्यापूर्वी रुग्णाच्या वडिलांना कोरोना झाला होता. नंतर मुलाची टेस्टही पॉसिटिव्ह निघाली. सुदैवाने या रुग्णाच्या पत्नीला या विषाणूची लागण झालेली नाही. आतापर्यंत 32 जणांची टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी 28 जणांची टेस्ट निगेटिव्ह निघाली आहे.
तर दुसरीकडे बिहारच्या पाटण्यात चार संशयित कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. चारही रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांची टेस्ट करण्यात आली आहे.
कॅनडाहून लखनऊमध्ये आलेल्या एका महिला डॉक्टरमध्येही कोरोनाचे लक्षण आढळलेआहेत. त्यांना किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या सर्व नातेवाईकांवर निगराणी ठेवण्यात आले आहे. सदर महिला कॅनडाच्या टोरंटो शहरात राहत होती. रविवारी ती लखनौमध्ये पोहोचल्यानंतर मंगळवारी त्यांना खोकला आला. बुधवारी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांची टेस्ट केल्यानंतर ती पॉसिटिव्ह निघाली आहे.
आयपीएल या टी-20 स्पर्धेलाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे. आयपीएलला परवानगी देऊ नका, अशी याचिका चेन्नई उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर कर्नाटक सरकारकडूनही आयपीएल रद्द करा, ही मागणी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे करण्यात आली. त्यानंतर आगामी एक ते दोन दिवसांत महाराष्ट्र सरकारकडून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
पुण्यापाठोपाठ मुंबईतही कोरोनाने शिरकाव केला आहे. महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या सहापैकी दोन रुग्णांचे ब्लड रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्यात काल पाच रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रुग्ण आढळल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असून मुंबईकरांसह राज्यातील जनतेने घाबरू नये, पण काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सुरुवातीला चीनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूने तीन हजारांहून अधिक चिनी नागरिकांचे बळी घेतले. त्यानंतर संपूर्ण जगभरात या विषाणूने हातपाय पसरले आहेत. जगभरातील बळींची संख्या 4,011 वर पोहोचली आहे, तर 1,10,000 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. हिंदुस्थानात केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बंगळुरू आणि जम्मू-कश्मीर या राज्यांना विषाणूच्या फैलावाची चिंता वाढली आहे. अवघ्या काही दिवसांत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 59 वर पोहोचली आहे.

























































