
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असतानाच हार्बरच्या डाऊन मार्गावर एका जुन्या इमारतीचे बांधकाम सकाळी ऐन गर्दीच्या वेळी थेट रूळांवरच कोसळल्याने खळबळ उडाली. याच वेळी मस्जिद बंदर स्थानकातून पनवेलच्या दिशेने निघणार्या लोकलच्या मोटरमनने तत्परता दाखवित ब्रेक दाबल्याने लोकल जागच्या जागी थांबल्याने मोठा अनर्थ टळला.
हार्बरमार्गावर यापूर्वी सँडहर्स्ट रोड येथे म्हाडाच्या इमारतीचा पाया खचून ट्रॅकवर दगड-विटा कोसळल्या होत्या. मध्य रेल्वेने दुपारी दोन तासांचा स्पेशल ट्र्रॅफीक ब्लॉक घेऊन हे धोकादायक बांधकाम हटविले. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील अनेक जुनी बांधकाम रेल्वेसाठी कायमची डोकेदुखी ठरली आहेत. सँडहर्स्ट रोडवरील भिंत काही वर्षांपूर्वी ट्रॅकवर कोसळून अशाच प्रकारे गोंधळ उडाला होता. त्यावेळी हार्बर मार्गिका 24 तास बंद ठेवावी लागली होती.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू असून सकाळी सवा सातच्या सुमारात पनवेल लोकल मस्जिद बंदर वरून निघण्याच्या बेतात असणारा इमारतीचा काही भाग ट्रॅकवर कोसळला. मोटरमन शशिकांत कांबळे यांनी लोकल पुढे जाऊ न दिल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांनी गार्डला संदेश दिल्याने गार्डने नियंत्रण कक्षाला कळविले. पंधरा मिनिटांत अभियंता विभागाच्या स्टाफने धाव घेत ट्रॅक साफ तात्पूरता साफ करीत लोकलचे ट्रॅफिक पूर्ववत केले.
बेस्टचे सबस्टेशन होते…
मध्य रेल्वेने दुपारी 2 ते 4 यावेळेत स्पेशल ब्लॉक अर्धवट पडलेले अन्य बांधकाम हटविले. या ठिकाणी बेस्ट सबस्टेशन होते अशी माहिती सूत्रांनी दिली, परंतू हे सबस्टेशन इमारतीच्या कंपाऊंडमध्ये असून ग्राहकांनीच ते बांधल्याचे बेस्टने म्हटले आहे. हे बांधकाम अनधिकृत असून ते हटवावे अशी नोटीस मध्य रेल्वेने रहिवाशांना दिली आहे.



























































