रेल्वेची जाळी तोडून ट्रॅकवर टाकणाऱ्या दोन जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन,मुंबई

रेल्वे रुळांच्या कडेला असणारे तारांचे कुंपण चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरटय़ांना पश्चिम रेल्वे सुरक्षा बल आणि महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी पाचशे ते सातशे मीटर पाठलाग करून पकडल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या चोरटय़ांनी तारांची जाळी ट्रकवरच टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षा जवानांनी वेळीच तारा हटविल्याने मोठा अपघात होण्यापासून टळला आहे.

मरीन लाइन्स आणि चर्नी रोड स्थानकांच्या दरम्यान हिंदू जिमखान्याजवळ रेल्वेने कुंपण म्हणून सुरक्षेकरिता लावलेली लोखंडी जाळी बाहेरील व्यक्ती तोडत असल्याचे मरीन लाइन्स स्थानकात पेट्रोलिंग करणाऱ्या आरपीएफचे जवान गोविंदा मीणा यांना दिसले. त्यांनी त्यांना ओरडत हटकले असता त्यांनी हातातील लोखंडी जाळी तशीच एक नंबर ट्रकवर टाकून ट्रक क्र. चारवरून बाहेर पळण्यास सुरुवात केली.

आरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्याला याबाबत माहिती देताच त्यांनी त्याचदरम्यान आलेल्या चर्चगेट-बोरिवली लोकलच्या मोटरमनच्या केबिनमध्ये बसून ट्रकजवळ पोहचत धोकादायकपणे ट्रकवर टाकलेली तार वेळीच हटवली. तसेच पळून जात असलेल्या दोन जणांना कॉन्स्टेबल हजारीलाल, दीपक आव्हाड, गोविंदा मीणा, अमुल पाखरे यांनी शहराच्या हद्दीत 700 ते 800 मीटर पाठलाग करून पकडले. त्यामुळे मोठा अपघात होण्यापासून वाचला. गौतम पटेल आणि अब्बास शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून ते फुटपाथवर राहत असल्याचे उघड झाले.