
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
मराठवाड्यात अजूनही वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान सुरूच आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होत असून, विजा कोसळण्याच्या घटना सुरू आहेत. गुरुवारी विजा कोसळून विभागात ८ जणांचे बळी गेले आहेत. नांदेड जिल्ह्यात वंâधार, देगलूर आणि किनवट तालुक्यात दोन भावंडांसह ४ जणांचा मृत्यू झाला असून, धाराशिव जिल्ह्यात दोन महिला वीज पडून दगावल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील जळकोटमध्ये एका विद्यार्थ्याचा, तर औसा तालुक्यात एका शेतकऱ्याचा विजेने बळी घेतला आहे.
नांदेड जिल्ह्यात मुखेडजवळ कंधार तालुक्यात पेठवडज ग्रामपंचायत हद्दीतील चुडाजीचीवाडी येथे विक्रम उद्धव मुंडकर (२७) याचा वीज पडून मृत्यू झाला. गुरे बांधण्यासाठी विक्रम गोठ्यात गेला होता. त्याच वेळी गोठ्यावर वीज पडली. मृत विक्रम याच्या कावूâ इंदूबाई गोविंद मुंडकर (५०) या गंभीर जखमी झाल्या. देगलूर तालुक्यात केदारकुंठा येथे शेतकरी मारोती केशवराव बाराळे (५०) हे शेतात काम करत होते. पाऊस आल्याने ते झाडाखाली थांबले. या झाडावर वीज पडून मारोती यांचा मृत्यू झाला. किनवटपासून ५ कि.मी.वर मलकापूर तांडा येथे सायंकाळी पाउस आला. शेतात काम करताना दोन भावंडांचा झाडाखाली आश्रयाला बसले असताना वीज पडून मृत्यू झाला. हेमंत लवसिंग जाधव (१०) व शालिनी जाधव (८) अशी या मृत भावंडांची नावे आहेत. या दोघांचे आई-वडील या वेळी शेतात काम करत होते.
धाराशिव तालुक्यातील वाणेवाडी शिवारात शेतात काम करत असताना दुपारी दीड वाजता अचानक वीज कोसळून शालुबाई पवार (५०) व शीतल घुटुकडे (३२) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत शामल लहु सरवदे (४०), कौशल्या शेषराव सरवदे (४५) व छाया भास्कर सरवदे (५०) या महिला जखमी झाल्या आहेत.
लातूरच्या जळकोट तालुक्यातील डोंगरगाव येथे आश्रमशाळेत दहावीत शिकणारा वसीम हसन भांडे (१६) याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. त्याचे चुलत सलीम भांडे यात थोडक्यात बचावले. औसा तालुक्यात कन्हेरी येथे शेतकरी सुभाष लिंबाजी चव्हाण (६०) हे गुरांना वैरण-पाणी करण्यासाठी शेतात गेले होते. तेथे वीज अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला.






























































