कार-ट्रकच्या धडकेत दोनजण गंभीर जखमी, कातरखटाव येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव कार आणि ट्रकच्या धडकेत दोनजण गंभीर जखमी झाले असून, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. नीलेश मुरलीधर बोबडे (वय 45, माळेगाव, जि. पुणे) असे जखमीचे नाव असून, दुसऱया जखमीचे नाव समजू शकले नाही.

स्कोडा कार बारामतीहून सांगलीकडे जात होती. सकाळी सव्वासात वाजता कातरखटाव येथील मिरज-भिगवण मार्गावरील विजयराज हॉटेलसमोर उसाच्या ट्रक्टरला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱया ट्रकला कार धडकली. यामध्ये स्कोडा गाडीतील नीलेश बोबडे यांच्यासह एक युवक जखमी झाला आहे. बोबडे यांच्या पायाला व डोक्याला मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, तर दुसऱयाचा एक पाय निकामी झाला आहे. अपघाताचा आवाज होताच गावातील युवकांनी जखमींना रुग्णालयात हलविले. वडुज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराजे देशमुख तपास करीत आहेत.