
सामना ऑनलाईन । मुंबई
कॅनडाला जाण्यासाठी व्हिसा आणि विमानाचे तिकीट मिळवून देतो असे सांगत मुंबईला बोलावून तिघा बांगलादेशी नागरिकांचे पैसे जबरदस्तीने हिसकावून घेणाऱ्या दोघांना चेंबूर पोलिसांनी पकडले. दोघेही मुंबई विमानतळावरून कोलकात्याला पळण्याच्या तयारीत असताना त्यांच्यावर झडप घालण्यात आली.
मकसुद परवेज अब्दुल गफार खंडाकर (४०) याचे मलेशियामध्ये मोबाईलचे दुकान आहे. मकसुद बांगलादेशचा असून त्याचे दोन बांगलादेशी मित्र सौदी अरेबियात मजूर म्हणून काम करतात. त्या दोघांना कामासाठी कॅनडाला जायचे होते. त्यासाठी ते व्हिसा आणि विमानाचे तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात होते. बांगलादेशातील एकाने तिघांना प्रत्येकी १० लाखांत व्हिसा मिळवून देतो असे सांगितले आणि हिंदुस्थानात बोलावून घेतले. मात्र कोलकातामध्ये काम होत नसल्याने त्या इसमाने सजिद कुमार याला मदत करण्यास सांगितले. मात्र सजिदकडूनही काही होत नसल्याने मग त्याने शाबाज अली याच्याकडे व्हिसा आणि तिकीट काढून देण्याची जबाबदारी दिली. मग शाबाजने त्या तिघांना पैसे घेऊन मुंबईत बोलावले. ते तिघे ठरल्याप्रमाणे मुंबईत आल्यानंतर चेंबूर येथे गेले. चेंबूरमध्ये एका कार्यालयात तिघांना बोलावून शाबाद, सजिद यांनी अन्य चौघांना हाताशी धरून त्या तिघांना धमकावले आणि त्यांच्याकडील पाच हजार अमेरिकन डॉलर आणि हिंदुस्थानी रुपये असे साडेसात लाख रुपये हिसकावून घेऊन तिघांना कार्यालयाबाहेर काढले. त्यानंतर मुंबई सोडण्यासाठी शाबाज आणि सजिद यांनी विमानतळ गाठले. मात्र चेंबूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गडकरी व त्यांच्या पथकाने तत्काळ विमानतळ गाठून दोघा आरोपींना पकडले. अन्य चार आरोपी फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे.


























































