
सामना प्रतिनिधी, पालघर
पुलवामा हल्ल्यानंतर सर्वत्र हायअलर्ट जारी केले असताना आज बोईसरजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेल्या दोन वाहनांवर पोलिसांनी झडप घातली आहे. ही स्फोटके खाणमाफियांसाठी आणली जात असल्याचे उघड झाले असून गेल्या चार महिन्यांपासून बिनदिक्कतपणे गुजरातमधून ही रसद सुरू होती. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे खाणमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
बोईसर पूर्वेकडील नागझरी, लालोंडे, निहे, किराट, गुंदले या भागात मोठय़ा प्रमाणात दगडाच्या खाणी आहेत. या खाणींसाठी खाणमाफियांकडे गुजरात येथून जिलेटिन स्फोटकाचा साठा आणला जात होता. गेल्या चार महिन्यांपासून मोठय़ा प्रमाणात या भागात जिलेटिन स्फोटकाचा बेसुमार पुरवठा सुरू होता. नागझरीत जिलेटिन स्फोटात एका युवकाच्या मृत्यूनंतर हा प्रकार चव्हाट्यावर आला. याची गंभीर दखल घेत पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत बोईसर शाखेने चिल्हार येथे स्फोटकांनी भरलेल्या वाहनांवर कारवाई केली. ही स्फोटके निहे येथील एका खदानीत येत असल्याचे समोर आले आहे.
खुलेआम तस्करी
नागझरी भागात काही खाणमालकांकडे जिलेटिन वापराबाबत परवाने आहेत तर काही खदानमालकांनी गुजरात येथील एका ठेकेदाराला नियमबाह्यपणे स्फोटकाचा ठेका दिला आहे. या भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर खाणींमध्ये स्फोट करण्यासाठी खदानमाफिया चोरटय़ा पद्धतीने जिलेटिन व डेटोनेटर याची तस्करी करत असतात.


























































