
सामना प्रतिनिधी । उरण
येथील एपीएम ( मर्स्क ) कंपनीच्या गोदामात कंटेनरमधून मार्बलच्या लाद्या अंगावर कोसळून झालेल्या अपघातात दोन मजूर जागीच ठार झाले. तर एक मजूर गंभीररित्या जखमी झाला आहे.
पोलिस सुत्रानुसार तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत एपीएम (मर्स्क ) कंपनीचे कंटेनर गोदाम आहे. या कंटेनर गोदामात कंटेनर हाताळणीचे काम चालते. गुरुवारी या गोदामात कंटेनरमधून आलेल्या मार्बलच्या लाद्या खाली उतरविण्याचे काम सुरु होते. अचानक लाद्यांचा लोड थेट मजूरांच्या अंगावर कोसळला. लाद्यांच्या अवजड लोडखाली दुदैवाने तीन मजूर दबले गेले. त्यापैकी दोन मजूर जागीच ठार झाले. तर एक मजूर गंभीररीत्या जखमी झाला असुन त्याला उपचारासाठी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली. मात्र मृत आणि जखमी झालेल्या मजूरांची नावे अद्यापही कळू शकलेली नाहीत. तसेच घटना नोंदविण्याचे काम अद्यापही सुरुच असल्याचेही उरण पोलीस ठाण्यातुन सांगण्यात आले.




























































